क्राइम
नांदूरघाट येथे चोरट्यांनी सराफा दुकान फोडले…..!
केज दि.२६ – अज्ञात चोरट्यांनी सराफा दुकानाचे शटर तोडून दुकानातील कपाट गावाबाहेर नेले. कपाट फोडून चोरट्यांनी कपाटात असलेले नगदी रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने असा १ लाख ८ हजार ६९० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना केज तालुक्यातील नांदूरघाट येथे गुरुवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
नांदूरघाट येथील सोनार कारागीर घनश्याम विश्वनाथ महामुनी यांचे गावात शाम अलंकार नावाचे सोन्या – चांदीच्या दागिन्याचे दुकान आहे. गुरुवारी रात्री घनश्याम महामुनी हे दुकान बंद करून गेल्यानंतर मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील दागिने ठेवलेले कपाट बाहेर काढून चौसाळा रस्त्यावरील गावालगतच्या नदीजवळ नेऊन कपाट फोडले. कपाटातील कागदपत्रे काढून फेकून देत कपाटात ठेवलेले नगदी २६ हजार ४०० रुपयांची रोकड, २९ हजार ४०० रुपये किंमतीचे ४९० ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजण, २४ हजार ९९० रुपये किंमतीची ६ ग्रॅमची सोन्याची अंगठी, ११ हजार २०० रुपये किंमतीचे १६० ग्रॅमचे चांदीचे पायातील जोडवे, १३ हजार ५०० रुपयांची ४५० ग्रॅम चांदीची मोड, ३ हजार २०० रुपये किंमतीच्या ४० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या अंगठ्या असा १ लाख ८ हजार ६९० रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. ऐवज घेऊन जाताना चोरट्यांनी कपाट नदीत फेकून दिले. या घटनेची माहिती मिळताच केज ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, फौजदार दादासाहेब सिद्धे, पोलीस नाईक दिलीप गित्ते, जमादार जसवंत शेप यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घनश्याम महामुनी यांच्या खबरेवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनात फौजदार दादासाहेब सिद्धे हे करीत आहेत.
दरम्यान सदरील घटनेचा मागोवा घेण्यासाठी श्वान पथक पाचारण करून परिसर पिंजून काढण्यात आला आहे. परंतु अद्याप कांही सुगावा लागला नसला तरी पोलीस पथक चोरट्यांच्या मागावर आहेत.