ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला सक्त निर्देश……!
मुंबई दि.८ – दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार झपाट्याने होत आहे. महाराष्ट्रातही ओमायक्रॉन व्हेरियंटचे 10 रुग्ण आढळले आहेत. राज्य मंत्रीमंडळाची आज बैठक पार पडली, यामध्ये ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता लसीकरण वेगानं वाढवण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळ बैठकीत दिले आहेत.
ओमायक्रॉन विषाणुच्या संसर्गाचा वेग अतिशय जास्त असून त्याला रोखण्यासाठी राज्यातील लसीकरण देखील वेगाने वाढले पाहिजे, यादृष्टीने जेथे लसीकरण कमी आहे तिथे ते वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले. महाराष्ट्राने सध्या 12 कोटी 3 लाख 18 हजार 240 डोसेस दिले असून 4 कोटी 37 लाख 46 हजार 512 जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. 7 कोटी 65 लाख 71 हजार 728 लोकांनी एक डोस घेतला आहे. 18 ते 44 वयोगटात 76.69 लोकांनी कमीत कमी 1 डोस तर 45 पेक्षा अधिक वयोगटातील 85.25 टक्के लोकांनी एक डोस घेतलेला आहे.
दरम्यान, गेल्या 12 तासात संपूर्ण जगात ओमायक्रॉनच्या रुग्णात 45 टक्के वाढ झाली असून 54 देशात याचा प्रसार झाला आहे. फ्रान्समध्ये दैनंदिन रुग्ण 40 हजारच्या पुढे आढळत असून जर्मनीत ही संख्या 50 हजाराच्या आसपास आहे. ऑस्ट्रेलियामध्ये देखील कोविड सुरु झाल्यापासून सगळ्यात मोठी लाट आली असून दररोज 7 हजारच्या आसपास नवीन रुग्ण आढळत आहेत. अमेरिकेत देखील नोव्हेंबर 2020 सारखी परिस्थिती उद्भवली असून दररोज एक लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. दक्षिण आफ्रिकेत गेल्या 2 आठवड्यात नवीन रुग्णात मोठी वाढ झाली असून दररोज दुपटीने रुग्ण आढळत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील काळजी घेण्याची गरज असून आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळले गेलेच पाहिजे यावर भर देण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले.