अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात……!
बीड दि.10 – अखेर (Kharif Season) खरीप हंगामातील (Insurance Amount Deposits) पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरवात झाली आहे. शुक्रवारी सकाळी मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा एसएमएस आला आहे. पीक निहाय आणि पिकाच्या स्थितीनुसार हे पैसे जमा झाले आहेत. शिवाय ज्या शेतकऱ्यांनी आगोदर विमा रक्कम अदा केली होती त्यांच्या बॅंक खात्यावर पहिल्यांदा रक्कम जमा होत आहे. खरीप हंगामात अधिकत्तर शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा अधिक भरला होता. आता रक्कम जमा होण्यास सुरवात झाली आहे. पण अनेक शेतकऱ्यांना पैसे जमा झाल्याचा एसएमएस न आल्याने संभ्रममाचेही वातावरण आहे.
पीक विमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळेच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास दिरंगाई झाली आहे. दिवाळीमध्ये ही रक्कम जमा करण्याचे आदेश राज्य सरकारने विमा कंपन्यांना दिले होते. मात्र, दीड महिन्यापासून हे पैसे प्रक्रियेतच अडकले होते. आता कुठे पैसे जमा होण्यास सुरवात झाली आहे. हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होणार असले तरी कुण्या शेतकऱ्यास अडचण असल्यास त्या शेतकऱ्यांनी बॅंकेत किंवा विमा कंपनीकडे नाही तर आपली तक्रार ही तहसीलदार यांच्याकडे दाखल करावी लागणार आहे. त्यानंतरच तक्रारीचे निरसन होणार आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी आगोदर विमा रक्कम भरली होती त्यांना अगोदर लाभ मिळत आहे.
खरीप हंगामात सोयाबीन, तूर, कापूस ही महत्वाची पिके आहेत. आता प्रत्येक मंडळानुसार भरपाईची रक्कम काढणे शक्य नाही पण सोयाबीनला हेक्टरी सरासरी 15 ते 18 हजाराची भरपाई देण्यात आली आहे तर तूर या पिकाला हेक्टरी 22 ते 25 हजार रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. तर कापसाला हेक्टरी 26 ते 28 हजाराची भरपाई ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. मंडळानिहाय नुकसानभरपाईची रकमेत बदल आहेत पण सरासरीच्या तुलनेत अशीच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे.
दरम्यान,विम्याचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन दावे करावेच असे नाही. तर ज्या शेतकऱ्यांनी ऑफलाईनही विमा रक्कम कंपनीकडे जमा केली आहे त्यांना देखील ही भरपाई मिळणार आहे. एवढेच की, ज्या शेतकऱ्यांनी अगोदर विमा रक्कम कंपनीकडे अदा केली आहे त्यांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळत आहे. तर उर्वरीत शेतकऱ्यांच्याही बॅंक खात्यावर ही रक्कम जमा होणार असल्याचे क़ृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.