क्राइम
केजमध्ये दीड लाखाचा गुटखा पकडला…..!
केज दि.१९ – शहरातील टपरी चालकांकडून काढलेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने बोबडेवाडी रस्त्यावर छापा मारून एक लाख ४६ हजाराचा गुटखा पकडला आहे. याप्रकरणी शनिवारी रात्री उशिरा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी केज शहरातील पान टपरीवर गुटखा मिळतो का ? याची खात्री करण्याच्या सूचना त्यांच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार पथकातील जमादार बालाजी दराडे, बी. आर. बांगर, एस. एस. जाधव, पोलीस नाईक ए. डी. अंहकारे, एस. बी. शेंडगे, आर. टी. भंडाने, केज ठाण्याचे पोलीस नाईक अमोल गायकवाड, बाळू सोनवणे, राजू गुंजाळ यांनी शहरातील टपरी चालकांची झडती घेतली. मात्र गुटखा मिळून न आल्याने त्यांनी गुटखा कुणाकडे मिळतो. याची माहिती घेतली असता बोबडेवाडी रस्त्यावरील अजीज पुरा भागातील एका रूममध्ये गुटख्याचा साठा करून ठेवल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे या पथकाने शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता छापा मारला असता तेथील तिघे पथकाला पाहून पळून गेले. सदर रुमचे पंचासमक्ष कुलूप तोडले असता रुममध्ये पांढऱ्या रंगाच्या २२ पोत्यात एक लाख ३२ हजार रुपयांचा फ्रेडन्स पान मसाला, ५ हजार १६० रुपायांचा हिरा पान मसाला, गुटख्याची पत्ती, ६ हजार पाचशे रुपयांचा राजनिवास गुटखा, पत्ती, २ हजार ३७० रुपयांचा गोवा, विमल गुटखा आढळून आल्याने पोलिसांनी १ लाख ४६ हजाराचा गुटखा जप्त करून केज पोलिसाच्या स्वाधीन केला आहे. जमादार बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.