पुणे | निसर्ग वादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन राज्याच्या काही भागात पाऊस झाला. या पावसामुळे राज्यातील काही शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई सुरु केली आहे, मात्र अशाप्रकारे पेरणी करण्याची घाई करु नका, असा सल्ला राज्यातील कृषितज्ज्ञांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
पेरणी करण्यासाठी जमिनीमध्ये पुरेशा प्रमाणात ओलावा निर्माण होण्याची आवश्यक्ता असते. साधारणतः १०० मिलीमिटर पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होतो. एवढा पाऊस झाल्यास पुढील जरी पावसाने खंड दिला तरी या ओलाव्याच्या जोरावर बियाण्यांची उगवण होऊ शकते.
सध्या झालेल्या अल्पशा पावसाच्या जोरावर काही शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या आहेत, मात्र जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने तसेच पावसाने ओढ दिल्याने या पेरण्या उलटण्याची शक्यता अधिक आहे.
दरम्यान, मान्सून सध्या भारताच्या दिशेने वाटचाल सुरु आहे, सध्या तो गोव्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. सगळं काही ठिक राहिलं तर थोड्याच दिवसात मान्सून वेळेत महाराष्ट्रात दाखल होईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये.