#Election
६० उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद…….!
केज दि.21 – येथील नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत १३ प्रभागासाठी मंगळवारी २६ मतदान केंद्रावर ७७.५० टक्के मतदान झाले असून १६ हजार ७४१ मतदारांपैकी १२ हजार ९७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीतील उमेदवार आदित्य पाटील, शीतल दांगट माजी नगराध्यक्षासह ६० उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद झाले आहे.
केज येथील नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. १, २, ८, १२ हे चार प्रभाग वगळता उर्वरित १३ प्रभागासाठी निवडणूक झाली. मंगळवारी सकाळी ७.३० वाजेपासून शहरातील २६ केंद्रावर प्रत्यक्ष मतदान सुरुवात झाली. सकाळी थंडीमुळे मतदार घरातून बाहेर पडले नव्हते. सकाळी ८.३० वाजेच्या नंतर मतदारांची गर्दी वाढत गेली. सकाळी ९.३० वाजेपर्यंत १४.७९ टक्के मतदान झाले. त्यानंतर दुपारी १.३० वाजेपर्यंत केंद्रावर मतदारांची गर्दी राहिल्याने मतदारांनी रांगेत उभे राहून मतदान केले. दुपारी दीड वाजेपर्यंत ४५.२६ टक्के मतदान झाले होते. दुपारच्या सत्रात मतदारांची गर्दी ओसरली होती. दुपारनंतर ही मतदानाचा टक्का वाढत राहिला. तर सायंकाळी ५.३० वाजता मतदान ७७.५० टक्के मतदान झाले असून १६ हजार ७४१ मतदारांपैकी १२ हजार ९७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये ६ हजार ८८७ पुरुष तर ६ हजार ८८ स्त्री मतदारांचा समावेश आहे. कुठल्याही केंद्रावर अनुचित प्रकार घडला नसून मतदान शांततेत पार पडले. ही निवडणूक लढवीत असलेल्या माजी नगराध्यक्ष आदित्य पाटील, माजी नगराध्यक्षा शीतल दांगट, माजी उपनगराध्यक्ष पती दलील इनामदार, विद्या अशोक पाटील, हारून इनामदार, पुष्पलता हनुमंत भोसले, शहनवाज सौदागर, प्रदीप साखरे, बालासाहेब जाधव, मीना कपिल मस्के, समीर देशपांडे, सीता बनसोड, भाऊसाहेब गुंड, राजू इनामदार, अनिकेत रत्नाकर शिंदे, संदीप शिंदे, रुपाली रोडे, सोजरबाई गाढवे यांच्यासह इतर उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे.
केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, निवडणूक निर्णय अधिकारी शरद झाडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, नायब तहसीलदार सचिन देशपांडे हे मतदान केंद्रांना भेट देत लक्ष ठेवून होते.