क्राइम
शिंदी येथे महिलेस मारहाण, मायलेकाविरुद्ध गुन्हा दाखल……!
केज दि.२४ – हरभरा पिकातील शेळ्या काढा म्हणाल्यावरून एका शेतकरी महिलेस मायलेकाने शिवीगाळ करीत लाथाबुक्या, चप्पल आणि विटाने मारहाण केली. या मारहाणीत महिलेचा कानाचा पडदा फाटला असून डोके फुटल्याची घटना केज तालुक्यातील शिंदी येथे घडली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
शिंदी येथील द्वारकाबाई शिवाजी जोगदंड ( वय ४० ) यांच्या शिवारातील पोपळी वस्तीजवळील शेतातील हरभरा पिक शेळ्या खाऊ लागल्याने त्या शेळ्या शेतातून बाहेर काढा असे त्या म्हणाल्या असता सागर सतिश जोगदंड, आशाबाई सतिश जोगदंड या मायलेकाने त्यांना शिवीगाळ करीत चापटाबुक्याने मारहाण केली. त्यांच्या कानावर चप्पलने तर डोक्यात विटाने मारहाण केल्याने कानाचा पडदा फाटला असून डोके फूटल्याची घटना ४ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली होती. दरम्यान, रुग्णालयातून उपचार घेऊन आल्यानंतर २४ डिसेंबर रोजी द्वारकबाई जोगदंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर जोगदंड, आशाबाई जोगदंड या दोघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार उमेश आघाव हे पुढील तपास करत आहेत.