आपला जिल्हा
दुचाकी प्रवासात पाच लाख रु.चे दागिने गहाळ……!
केज दि.25 – कळंब येथील महिला तिच्या पतीसह केज मार्गे मोटार सायकल वरून परळीकडे जात असताना रस्त्यात गळ्यातील पर्सचा बेल्ट तुटून त्यातील सुमारे पाच लाख रु. चे सोन्याचे दागिने गहाळ झाले आहेत.
अधिक माहिती अशी की, दि. २५ डिसेंबर शनिवार रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास कळंब येथील धिरज पाटील हे त्यांची पत्नी रागिणी पाटील व लहान मुलगा यांच्या सोबत मोटार सायकल वरून क्र. (एमएच-२३/ डी-७०२३) केज मार्गे नातेवाईकांच्या लग्नाला परळीकडे जात होते. प्रवासा दरम्यान केज-कळंब रोडवरील कमल पेट्रोल पंप ते माऊली सिनेमा गृहाच्या दरम्यान त्यांच्या पर्सचा बेल्ट तुटून रस्त्यात पडली. मात्र त्यावेळी त्यांना फोन आल्यामुळे त्यांच्या लक्षात आले नाही. त्या पर्समध्ये छोटी हॅन्ड पर्स ठेवलेली होती. त्यामध्ये पस्तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठन, दहा ग्रॅम वजनाच्या दोन व पाच ग्रॅम वजनाच्या दोन अशा चार अंगठ्या, दहा ग्रॅम व पाच ग्राम वजनाचे सोन्याचे दोन लॉकेट, पाच ग्रॅम वजनाची एक सोन्याची नथ, दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानात घालायचे टॉप्स व रोख पंधरा हजार असा सुमारे पाच लाख रु. किंमतीचा ऐवज गहाळ झाला आहे.
सदर प्रकरणी केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे हे पुढील तपास करीत आहेत.