आष्टी दि.२६ – (सुरेश कांबळे) नगरपंचायत ची निवडणूक जोरात सुरू असली तरी आता कोण होणार नगराध्यक्ष ? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार ? याचे गणित जुळवण्याचे महाविकास आघाडी व भाजपा कडून खलबते चालू आहेत. त्यामुळे नगरपंचायत चे राजकारण तापलेले दिसून येत आहे.
प्रत्येकजण आपलीच सत्ता येण्याची वलग्ना करत आहे. आष्टी नगरपंचायत च्या ओबीसी प्रवर्गातील प्रत्येकी चार प्रभागातील सर्वसाधारण गटासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. या प्रभागात 18 जानेवारीला मतदान होणार आहे. ही सोडत आष्टी येथे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार विनोद गुंडमवार यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 3 सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक चार सर्वसाधारण( महिला), प्रभाग क्रमांक सहा सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रमांक 11 सर्वसाधारण अशी सोडत काढण्यात आली. त्यामुळे पुन्हा आता भाजप व आघाडीची या जागेसाठी उमेदवार शोधाशोध सुरू झाली असुन पुन्हा मतदाराच्या दारात मते मागायला जाण्याची वेळ येणार असून मतदार राजा आता काय करणार याकडे लक्ष लागले आहे. खुल्या जागेसाठी 50 टक्के आरक्षण असल्याने दोन जागा पुरुष, दोन जागा महिला अशी सोडत निघाली. 19 जानेवारीला सर्व जागांचे निकाल घोषित केले जाणार आहेत. आरक्षणाचा मुद्दा कोर्टात असल्याने चार जागांची आष्टी नगरपंचायत निवडणूक लांबणीवर पडली होती. मात्र उर्वरित ओबीसी जागांचे आरक्षण रद्द झाल्याने महिला आरक्षणासाठी सोडत काढण्यात आली. त्यामुळे महाविकासआघाडी आपल्यापरीने पुन्हा उमेदवारासाठी चाचपणी करत आहे. तर भाजपा पुन्हा नव्याने मोर्चेबांधणी करण्याची शक्यता आहे. यापूर्वी झालेल्या मतदानात दुरंगी निकालाची चर्चा मतदारात चालू आहे. चार जागांसाठी चुरस निर्माण होणार असून उर्वरित जागा आपल्या ताब्यात घेऊन बहुमत मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.
महाविकास आघाडी व भाजपात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आष्टी नगरपंचायत चे वातावरण पुन्हा तापू लागल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत भाजप व महाविकास आघाडीने आपली ताकद पणाला लावली. मागील निवडणुकीत दोन्ही पक्षाने तुल्यबळ उमेदवारांना उमेदवारी देऊन रिंगणात उतरवले होते. आता नेमके कोणाला कौल मिळणार ही चर्चा सध्या तालुक्यात रंगत आहे. आमदार भीमसेन धोंडे आणि आमदार सुरेश धस हे एकत्रितरीत्या नगरपंचायत निवडणूक लढले असते तर एक हाती सत्ता आली असती अशी राजकीय जाणकारत आता चर्चा सुरू आहे. मात्र नगरपंचायती मध्ये कोणाची सत्ता येईल हे अद्यापतरी गुलदस्त्यात आहे.