मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सबरोबर चर्चा करून दोन दिवसात निर्णय घेतला जाईल – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई दि.२९ – महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, निर्बंध आणि 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचं लसीकरण यासह शाळा सुरु ठेवण्याबाबत भाष्य केलं. केंद्र सरकारच्या 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना लस द्यायची आहे. आम्ही त्या दृष्टीनं सज्ज आहोत. भारत सरकारनं लहान मुलांना कोवॅक्सिन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणं कोवॅक्सिन देण्यात येणार आहे. शाळेत कोरोना लसीकरण करता येईल का याची चाचपणी सुरु असल्याचं राजेश टोपे म्हणाले. राज्यातील शाळांमध्ये काही ठिकाणी विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याचं कळलंय. अहमदनगरला जे झालंय ते केस स्टडी म्हणून विचार केला जाईल. पॉझिटिव्ह झाले तरी मुलांचा आजार बळावत नाही, त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असते. मात्र, याबाबत मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सबरोबर चर्चा करून दोन दिवसात शाळांबाबत निर्णय घेतला जाईल, असं राजेश टोपे म्हणाले.
दरम्यान, कोरोना नियम पाळणार नसू तर निर्बंध वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्यांचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, टास्क फोर्स आणि मंत्रिमंडळ निर्णय घेईल. वाढत असलेली रुग्णसंख्या, ओमिक्रॉनची रुग्णसंख्या या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची तातडीनं बैठक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 167 वर पोहोचलीय, त्यापैकी जमेची बाजू 91 जण बरे झाले आहेत ही आहे.