दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवी नियमावली जाहीर…….!
मुंबई दि.२९ – राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणार एक मोठा निर्णय घेतला आहे. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना आता परीक्षेच्या आदल्या दिवशीही अर्ज करता येणार आहे. परीक्षेचा अर्ज भरण्याचे विलंब शुल्क माफ केलं आहे, फक्त नियमित शुल्क विद्यार्थ्यांकडून घेतलं जाणार आहे. राज्य सरकारने परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची विद्यार्थ्यांना परवानगी दिली आहे, त्यामुळे परीक्षेला मुकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
येत्या 15 मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. कोरोनाकाळात दहावीच्या परीक्षा दोन वर्षे रद्द झाल्या आहेत. त्यामुळे दोन वर्षानंतर विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षा देणार आहेत, दोन वर्षे विद्यार्थ्यांना मुल्यमापनाच्या आधारे पास करण्यात आले होते. बारावीची परीक्षा येत्या 4 मार्चपासून सुरू होणार आहे. यात उशीरा अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना आधी विलंब शुल्क भरावे लागत होते, मात्र आता विलंब शुल्कही सरकारकडून माफ करण्यात आले आहे. अर्ज भरताना विद्यार्थ्यांकडून नियमीत शुल्क घेतले जाणार आहे. याबाबत सविस्तर लेखी आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डानं काढले आहेत.