व्हायरल
बीड जिल्ह्यातील एका वाढदिवसाची चर्चा लै जोरात……..!

बीड दि.२ – एरव्ही आपण राजकिय नेत्याचे, पुढाऱ्याचे आमदार-खासदारांचे वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरे झालेले पाहिले असतील.मात्र बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये एका भिक मागणाऱ्या व्यक्तीचा वाढदिवस काही तरुणांनी मोठ्या थाटामाटात साजरा केलाय. याचं कारणही तसंच आहे.
सध्या बीड जिल्ह्यात अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचं फॅड सुरू आहे. कधी जेसीबीतून फुलांची उधळण तर कधी तलवारीने केक कापणे एवढंच नाहीतर वाढदिवसाच्या नावाने लाखोंची उधळपट्टी करायची.याचा निषेध करण्यासाठी तरुणांनी एकत्र येत चक्क एका भीक मागणाऱ्या व्यक्तीचे शहरात पोस्टर लावले आहेत. एवढेच नाही तर रात्री डीजे लावून जल्लोषात त्याचा वाढदिवस साजरा केलाय. भिक मागणाऱ्या व्यक्तीच्या वाढदिवसाचे शहरात बॅनर लावून भावी नगरसेवक म्हणून शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत. डोक्यावर फेटा आणि सेल्फी काढत शिवाय बँडबाजा लावून, वाढदिवसानिमित्त मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. भिक मागणाऱ्या व्यक्तीचा वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून तो चर्चेचा विषय बनला आहे.
दरम्यान, वाढदिवसापोटी पैशांची उधळण करणाऱ्या नेत्यांना आळा बसावा म्हणून हा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसावर लाखोंची उधळपट्टी करण्यापेक्षा गोरगरीब निराधारांना मदत करण्यासाठी पुढे यावं. असे आवाहन संयोजक तरुणांनी केलं आहे.