क्राइम
केज तालुक्यात हवेत गोळीबार, तिघांवर गुन्हा दाखल……!
केज दि. 4 – ट्रकला जीप आडवी लावून चालकास धमकावत कारखान्याची तुझ्याकडे असलेली बाकी दे असे म्हणत तिघांनी संगनमत करत लाथाबुक्याने मारहाण केली व हवेत गोळीबार केला. तालुक्यातील चंदन सावरगाव येथील बसस्थानकासमोर ३ जानेवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. या प्रकरणी युसुफ वडगांव पोलीस ठाण्यात तिघा विरोधात गुन्हा दाखल झाला असून तीनही आरोपी अटक करून पुढील तपास सहाय्यक निरीक्षक संदीप दहीफळे करीत आहेत.
फिर्यादी अंकुश रामराव राठोड (२८, रा.लातूर) हे ट्रक चालक म्हणून काम करतात. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ते ट्रक घेऊन चंदनसावरगाव बसस्थानकापासून जात होते. यावेळी जीपमधून क्र (एम. एच. २२ ए. एम. १०८३) आलेल्या बाबा तुळशीराम पोले, बाळु टोम्पे (दोघे रा. अकोली ता. गंगाखेड) व हनुमंत लटपटे (रा. कोदरी ता. गंगाखेड) या तिघांनी राठोड यांच्या ट्रकला जीप आडवी लावून त्यांना रस्त्यात ट्रक थांबविण्यास भाग पाडले. त्यानंतर चालक राठोड यांना ‘तुझ्याकडे गंगाखेड शुगर कारखान्याचे पैसे बाकी आहेत, तू कारखान्याला ट्रक व मजुर पाठवले नाहीस. आम्ही कारखान्याकडुन पैसे वसुलीचे काम करतो तु आता पैसे दे असे सुनावले. त्यावर राठोड यांनी आपण केलेल्या कामाचा हिशोब करू व नंतर माझ्याकडे फिरलेले पैसे तुम्हाला देतो असे सांगितले. परंतु यावर संतापलेल्या तिघांनी अंकुश राठोड यांना शिवीगाळ करून चापटाबुक्याने मारहाण सुरू केली.
दरम्यान, राठोड यांचे नातेवाईक भांडण सोडवण्यास आले असता आरोपी बाबा पोले म्हणाला की, माझ्याकडे पिस्तुल आहे, मी एकालाही जिवंत सोडणार नाही असे म्हणून त्याने त्याच्या पिस्तुलमधून हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केली. या प्रकरणी अंकुश शामराव राठोड यांच्या फिर्यादीवरुन तिघांविरूध्द युसूफवडगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युसुफवडगांवचे सहाय्यक निरीक्षक संदीप दहिफळे यांनी तीनही आरोपींना गजाआड केले असून पुढील तपास करत आहेत.