#Social
स्मशानभूमीच नसल्याने संतप्त नातेवाईकांनी महिलेचे प्रेत आणले केज तहसील कार्यालयात……!
केज दि.5 – तालुक्यातील अनेक गावांत स्मशानभूमीचा प्रश्न आहे. कित्येकवेळा अंत्यविधी वेळेवर न झाल्याने प्रेताची अवहेलना झाल्याचे प्रकार घडलेले आहेत. तशीच घटना आजही तालुक्यात घडली असून सोनेसांगवी येथील संतप्त नातेवाईकांनी स्मशानभूमी नसल्याने वृद्ध महिलेचे प्रेत थेट तहसील कार्यालयात आणून ठेवल्याने खळबळ माजली होती.
तालुक्यातील सोनेसांगवी येथील लक्ष्मीबाई शहाजी कसबे ह्या वृद्ध महिलेचे निधन झाले.परंतु सदर गावात स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित असल्याने महिलेचा अंत्यविधी करण्यास जागाच नाही असे म्हणत महिलेच्या नातेवाईकांनी प्रेत थेट केज तहसील कार्यालयात आणले. आम्हाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिल्याशिवाय आम्ही हलणार नाहीत अशी भूमिका घेतल्याने प्रशासन हतबल झाले. तहसीलदार दुलाजी मेंडके हे गावातील सामाजिक कार्यकर्ते रमेश भिसे, मुकुंद कणसे यांच्यासह नातेवाईकांबरोबर चर्चा करून करून वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून लवकरात लवकर सदरील प्रश्न सोडवण्यासाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. सदरील प्रश्नी काय तोडगा निघतो, लेखी आश्वासन काय दिले जाणार हे चर्चेअंती निष्पन्न होईल. मात्र तूर्त प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.