”ही” लक्षणे असतील तर निष्काळजीपणा करू नका…..…!

मुंबई दि.6 – हिवाळ्यामध्ये सर्दी खोकला होणे हे अगदी सामान्य आहे. अनेकांना कफ चाही त्रास होतो. त्यातच कोरोना विषाणूचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉन वेगाने पसरत आहे. अशात सर्दी-खोकला होणं हे सामान्य राहत नाही, ही ओमायक्रॉनची लक्षणे असू शकतात. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने बुधवारी याबाबतचा इशारा दिला आहे. सर्दी-खोकला अथवा कफ झाल्यास हलक्यात घेऊ नका, कारण ही ओमायक्रॉनची लक्षणे असू शकतात, असे WHO ने म्हटले आहे.
सर्दी, खोकला, थकवा आणि रक्तसंचय …. ही ओमायक्रॉनची चार प्रमुख लक्षणे असल्याचे अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या विश्लेषणातून (US Centers for Disease Control and Prevention analysis) समोर आले आहे. युकेमधील झो कोव्हिड ऍपच्या संशोधनानुसार, मळमळ आणि भूक न लागणे ही सुद्धा कोरोनाची लक्षणे आहेत. दक्षिण आफ्रिका, अमेरिका, युकेमधील अभ्यासानुसार, ओमायक्रॉन व्हेरियंटमध्ये संसर्गाची अतिशय झपाट्याने होते. पण या रुग्णांमध्ये लक्षणे नसतात, त्यामुळे रु्गणालयात दाखल होणाऱ्याचे प्रमाणही कमी राहते.
‘ओमायक्रॉनची सर्दी सर्वसाधारण नाही, त्याला हलक्यात घेऊ नका. नुकत्याच हाती आलेल्या काही अहवालानुसार, डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत ओमायक्रॉनच्या हॉस्पिटलायझेशनचा धोका दर्शवत आहे. तरीही ओमायक्रॉनमुळे अनेकांना संसर्ग होऊ शकतो, असे ट्वीट जागतिक आरोग्य संघटनेच्या महामारी शास्त्रज्ञ डॉ. मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी केलं आहे. युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकामध्ये ओमायक्रॉनमुळे प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यामध्ये लसीकरण न केलेल्या व्यक्तींचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
ओमायक्रॉन म्हणजे सर्वसाधारण सर्दी नाही, यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे, असा पुनरुच्चार जागतिक आरोग्य संघटेनच्या मुख्य शास्त्रज्ञा डॉ. सौम्य स्वामीनाथन यांनी आपल्या ट्वीटमध्ये केला आहे. मोठ्या प्रमाणात लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात याव्यात. तसेच त्या रुग्णाचे निरीक्षण करण्यात यावे. जेणेकरुन कोरोनाची लाट येण्याआधीच आपण सज्ज असू, अन्यथा कोरोनाची मोठी लाट येऊ शकते, असेही स्वामीनाथन यांनी म्हटले.
लसीकरण वेगाने करुन आपण कोरोना रुग्णाचं संक्रमण अथवा संसर्ग टाळू शकतो, त्यामुळे अनेकांचे जीव वाचू शकतात, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या महामारी शास्त्रज्ञ डॉ. मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी सांगितलं. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेनं मंगळवारी सांगितले की, श्वसनमार्गाच्या वरील भागावर ओमायक्रॉन व्हेरियंट परिणाम करत असल्याचे संशोधनातून उघड झाले आहे. त्यामुळे इतर व्हेरियंटच्या तुलनेत ओमायक्रॉनची लक्षणे सौम्य आढळत आहेत. बहुतेकदा ओमायक्रॉन मोठ्या प्रमाणावर वरच्या श्वासनलिकेपर्यंत म्हणजे नाक, घसा आणि श्वासनलिकेपर्यंत मर्यादित राहतो .या व्हेरियंटने फुफ्फुसांना खूपच कमी नुकसान केले आहे, जेथे मागील प्रकारांमुळे अनेकदा गंभीर परिणाम होतात. पण यामुळे निमोनिया होण्याची भीती आहे, असे जागतिक आरोग्य संघटेनेचे अब्दी महमूद यांनी सांगितले.