क्राइम
लैंगिक अत्याचाराची धमकी देऊन पैसे उकळणाऱ्या ”त्या” महिलेवर आणखी एक गुन्हा…….!
केज दि.7 – लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन लुबाडणाऱ्या महिले विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्या नंतर पुन्हा आणखी त्याच प्रकारचा गुन्हा धारूर पोलीस ठाण्यात तिच्यावर दाखल झाला आहे.
केज पोलीस ठाण्यात केज येथील एका परित्यक्ता महिलेवर एका कार चालकावर लैंगिक अत्याचार केल्याची खोटी धमकी देऊन एक लाख रु. लुटल्या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदर महिला अटकेत असून तिला ७ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. मात्र तिची पोलीस कोठडी संपण्या अगोदरच दि. ६ जानेवारी रोजी धारूर पोलीस ठाण्यात केज तालुक्यातील एका शिक्षकाने सदर महिले विरुद्ध धारूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की, सहशिक्षिक बाजीराव चौरे व त्या महिलेचे मैत्रीपूर्ण संबंध होते. दि. ९ सप्टेंबर २०२१ रोजी ती चौरे यांना सोबत घेऊन धारूर येथे ती मैत्रिणीला भेटण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेली. तेथे अशोक मिसाळ आणि इतर अनोळखी चार ते पाचजण मिळून त्यांनी बाजीराव चौरे यांना त्या तरुणी सोबत अश्लील चाळे करायला लावले. तिच्यावर प्रेम आहे असे त्याच्या कडून वदवून घेतले आणि त्याचे मोबाईलने व्हिडीओ चित्रण केले. त्या नंतर त्यांनी चौरे यास धमकी देत त्याला मारहाण केली आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याची पोलिसात खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. तसेच हे प्रकरण मिटविण्यासाठी दहा लाख रु. ची मागणी केली. जर पैसे दिले नाहीत तर लैंगिक आत्याचार केल्याची तक्रार देऊन जेलमध्ये टाकू अशी धमकी देऊन जीवे मारण्याची धमकी दिली व ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. अशी माहिती बाजीराव चौरे यांनी दि. ६ जानेवारी रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना भेटून दिली आहे. त्या नुसार सदर तरुणी विरुद्ध धारूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५/२०२२ भा.दं.वि. १४३, ३८४, ३८६, ३८८, ३२३, ५०४ व ५०६ प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा तपास धारूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भालेराव हे करीत आहेत.
दरम्यान सदर प्रकरणातील महिलेला केज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिची १० जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी वाढवली आहे.