ब्लॅकमेलिंग प्रकरणी ”त्या” महिलेविरुद्ध आणखी एक गुन्हा युसुफ वडगाव पोलीसांत दाखल……!
केज दि.७ – सोलापूर येथे एकाच कंपनीत काम करत असताना झालेल्या ओळखीतून लग्न करण्याची केलेली मागणी धुडकवल्याने ”त्या” महिलेने केज तालुक्यातील तरुणाला बलात्काराची केस करील अशी धमकी देत ब्लॅकमेल करत दोन लाख रुपये उकळल्या प्रकरणी युसुफ वडगाव पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.
तालुक्यातील बनकरंजा येथील सुभाष नवनाथ नागरगोजे हा सोलापूर येथे एका खाजगी कंपनीत काम करत होता. त्या दरम्यान केज तालुक्यातील मोहिनी बप्पाजी भांगे ही महिलाही त्या कंपनीत काम करण्यास गेली होती. दोघेही एकाच तालुक्यातील असल्याने दोघांचे बोलणे होत असे. मात्र कांही दिवसांनी सदर महिलेने त्या तरुणाला लग्नाची मागणी घातली. परंतु तिचे अगोदरच लग्न झालेले असल्याच्या माहितीवरून त्याने लग्नास नकार दिला. परंतु सदर महिलेने त्याला वारंवार फोन करून माझ्याबरोबर लग्न कर नाहीतर पाच लाख रुपये दे असा तगादा लावला. या दरम्यान त्या तरुणाचे लग्न जमल्याची माहिती तिला मिळताच तिने आणखी पैशाची मागणी केली व पैसे नाही दिले तर तुझ्यावर बलात्काराची केस करील अशी धमकी दिली. मात्र सुभाष याने कंटाळून तिला तुला काय करायचे ते कर म्हणत धुडकावले. त्यामुळे सदर महिलेने केज पोलीसांत येऊन त्याच्या विरुद्ध 26 जून 2021 रोजी तक्रार केली असता त्याची चौकशी करण्यासाठी पोलीस त्याच्या घरी गेल्याने व हे मुलीकडील नातेवाईकांना कळल्याने त्याचे लग्नही मोडले.
मात्र सदरील प्रकार नेमका काय आहे याची चौकशी करण्यासाठी सुभाष चे वडील व नातेवाईक यांनी सदर महिलेची भेट घेतली असता सुभाष ने तीन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले व प्रकरण मिटवायचे असेल तर पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्याच दिवशी महिलेला दीड लाख रुपये दिले व रमेश नवनाथ घुले रा. टाकळी याच्या फोन पे वर सचिन नागरगोजे ह्याने 50 हजार जमा केले.
सुभाष नागरगोजे यांच्या फिर्यादीवरून मोहिनी बप्पाजी भांगे व रमेश नवनाथ घुले विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एपीआय विजय आटोळे हे करत आहेत.
दरम्यान मागच्या चारपाच दिवसांत सदर महिलेवर केज, धारूर आणि युसुफ वडगाव पोलीसांत गुन्हे दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ माजली असून एकानंतर एक घटना पुढे येत आहेत. यामध्ये आणखी कुणी बळी पडले आहेत का ? याचा तपास पोलीस करत आहेत.