मराठवाड्यात गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता…..!
बीड दि.१०- भारतीय हवामान विभागाच्यावतीनं (IMD) विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता व्यक्त केलीय. उत्तर भारतावरील ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (WD) प्रभाव, अरबी आणि बंगालच्या उपसागरातून एकत्र येणाऱ्या वाऱ्यामुळं महाराष्ट्रातील काही ठिकाणासंह मध्य भारतात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. आयएमडीनं 9 ते 13 जानेवारी पर्यंतचा हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार आज विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो ॲलर्ट जारी केला आहे.
उत्तरेकडील पश्चिम विक्षोभ,अरबी समुद्रातून येणारी आर्द्रता व पुढील 4-5 दिवस अरबी व बंगालच्या उपसागरातून एकत्र येणारे वारे यांच्या प्रभावामुळं मध्य भारतात पाऊस होण्याची शक्यता आहे. 9 ते13 जानेवारी दरम्यान महाराष्ट्रासह मध्य भारतात हलका-मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. आज विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारा पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, 10 जानेवारी :आयएमडीनं गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट दिला आहे. नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेडला यलो अलर्ट देण्यात आलाय. तर, बीड, लातूर, उस्मानाबाद, जालना आणि औरंगाबादमध्येही पावसाची शक्यता आहे.तर 11 जानेवारी : यलो अलर्ट : गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांना लागू असेल. तर, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.