सरकार म्हणतं शाळा सुरू करण्याचा निर्णय तज्ज्ञांशी बोलून घेतला अन तज्ञ तर वेगळंच बोलत आहेत……..!
मुंबई दि.२१ – कोरोना विषाणूनं गेल्या दोन वर्षापासून जनजीवन विस्कळीत करुन टाकलं आहे. कोरोना या महासाथीच्या रोगानं आणि त्याच्या नवनवीन व्हेरियंटनं चिंतेचं वातावरण पसरवलं आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. मात्र विद्यार्थ्यांचे संपूर्ण लसीकरण होण्याच्या अगोदर शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय हा घाईने घेतला असल्याचे म्हटल्याने पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.
येत्या सोमवारपासून पुन्हा शाळा-महाविद्यालये सुरु करण्यात येणार असल्याचा मोठा निर्णय, ठाकरे सरकारनं घेतला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय हा टास्कफोर्स व शिक्षणतज्ञ तसेच आरोग्य तज्ज्ञांशी चर्चा करून घेतल्याचे म्हटले. मात्र या निर्णयांनंतर आता तज्ज्ञांनी मोठा धोका असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्यावरुन भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शाळा सुरु केली तर मोठा धोका असल्याचं, तज्ज्ञांनी म्हटलं आहे. कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही. यातच तिसऱ्या लाटेनंही धडक दिली आहे. त्यामुळे जोपर्यंत मुलांचं लसीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणं योग्य नाही, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
दरम्यान, मुलांना कोरोना होऊन गंभीर इन्फेक्शन होऊ शकतं. अशी मुलं घरात गेल्यानंतर घरातील वयस्कर आणि इतर व्यक्तींना कोरोना पॉझिटिव्ह करू शकतात. घरातील इतर सदस्यांपर्यंत कोरोना पोहोचवू शकतात, असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे. त्यामुळे आत्ता शाळा सुरु करण्यास धोका असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.