दहावी आणि बारावी परिक्षे दरम्यान कांही विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला तर काय ? बोर्डाने केले स्पष्ट……!
पुणे दि.२२ – राज्यातील दहावी-बारावीतील 32 लाख विद्यार्थ्यांची 4 मार्चपासून परीक्षेला सुरूवात होणार आहे. परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे, परंतु परीक्षेपूर्वी कोरोना बाधित अथवा परीक्षा देताना कोरोना झालेल्या मुलांसाठी परीक्षेचे स्वरूप काय असणार ह्याची माहिती देण्यात आली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमुळे 2020-21 या शैक्षणिक वर्षात बहुतेक दिवस शाळा बंदच राहिल्या. ऑनलाइन शिक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना दिले. मात्र, बारावीच्या विद्यार्थ्यांना विशेषत: विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन पध्दतीने अध्यापन पचनी पडले नाही. त्यामुळे दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांचे ऑफलाइन वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय झाला. सध्या कोरोना वाढत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही या संभ्रमात पालक आहेत. अशा परिस्थितीत 4 मार्चपासून बोर्डाची परीक्षा सुरु होत आहे. परीक्षेपूर्वी कोरोना बाधित आढळलेल्या मुलांची पुन्हा स्वतंत्रपणे पुरवणी परीक्षा घेतली जाणार असून त्यासंबंधीचा प्रस्ताव शालेय शिक्षणमंत्र्यांकडे पाठविला जाणार आहे. नियमित परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसोबत कोरोना झाल्याने परीक्षा देता न आलेल्यांचीही परीक्षा होईल, असेही बोर्डाकडून सांगण्यात आले. तत्पूर्वी, कोरोना झाल्याने किती मुले परीक्षा देऊ शकणार नाहीत, याची माहिती संकलित केली जाणार आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून त्यात 18 वर्षांखालील अनेक मुले बाधित होऊ लागली आहेत. तरीही, 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोवॅक्सिन लस दिली जात असून आता शाळा सुरु झाल्यानंतर शाळांमध्येच लसीकरणाचे कॅम्प घेतले जाणार आहेत. दरम्यान, परीक्षेपूर्वी कोरोना बाधित मुलांना परीक्षा देता न आल्यास त्यांच्यासाठी पुरवणी परीक्षेचे नियोजन केले जाईल. नियमित परीक्षा संपल्यानंतर काही दिवसांतच त्यांची परीक्षा होईल. परंतु, त्या विद्यार्थ्यांना कोरोना रिपोर्ट अथवा सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचा दाखला मुख्याध्यापकांच्या माध्यमातून शिक्षणाधिकाऱ्यांकडे द्यावा लागणार आहे.
दरम्यान, दहावी-बारावीची परीक्षा नियोजित वेळेतच घेण्याचे नियोजन आहे. कोरोना बाधित विद्यार्थ्यांची आणि नियमित परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची एकत्रितपणे पुरवणी परीक्षा होईल. बाधितांची संख्या अधिक असल्यास नियमित व पुरवणी परीक्षेचा निकाल एकत्रित जाहीर होईल. जेणेकरून त्यांचे वर्ष वाया जाणार नसल्याची माहिती शरद गोसावी (अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ) यांनी दिली आहे.