एका एक्कर मध्ये तीन महिन्यात एक लाखाचे उत्पन्न घेतात ‘हे’ शेतकरी……!
उस्मानाबाद दि.२८ – जिल्ह्यातील भूम तालुक्यातील भांडगावची ओळख ही गाजराचे गाव म्हणून पंचक्रोशीत आहे. गेल्या अनेक वर्षापासून येथील शेतकऱ्यांनी ही ओळख कायम ठेवलेली आहे. 2 हजार लोकवस्ती असलेल्या या गावात तब्बल 750 एकरावर गाजराचेच पीक घेतले जाते. तीन महिन्यांमध्ये एकरी लाखोंचे उत्पन्न घेण्याचा फॉर्म्युला या गावातील शेतकऱ्यांना अवगत झाला आहे. त्यामुळे रब्बी-खरिपात नुकसान अथवा नफा झाला तरी गाजराचे पीक हे घेतलेच जाते. शिवाय येथील गाजराची चवच न्यारी असल्याने बाजारात याला मोठी मागणी आहे. काळाच्या ओघात आता पुन्हा सेंद्रीय शेतीचे महत्व वाढत आहे. पण याचे महत्व भांडगावच्या शेतकऱ्यांना यापूर्वीच अवगत झालेले असावे म्हणूनच कोणत्याही रासायनिक खतांची मात्रा न देता सेंद्रीय पध्दतीने हे पीक घेतले जात आहे. कमी खर्चात अधिकचे उत्पादन म्हणूनच भांडगावच्या शेतकऱ्यांना इतर पिकांपेक्षा गाजराचे पिकाचा अधिक गोडवा आहे.
यंदा वातावरणातील बदलामुळे शेती पिकांमध्ये मोठा बदल झाला आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार ज्वारी या मुख्य पिकाची जागा आता हरभऱ्याने घेतली आहे. राज्यात, मराठवाड्यात काहीही असो मात्र, येथील रब्बी हंगामातील पीक हे गाजरच राहिलेले आहे. गेल्या अनेक वर्षापासून याची लागवड शेतकरी करीत असल्याने लागवडीपासून घ्यावयाची काळजी, काढणी आणि बाजारपेठ याची माहीती शेतकऱ्यांना झाली आहे. यंदाही 700 हून अधिक एकरामध्ये लागवड करण्यात आली आहे. एकरी 12 ते 13 किलो बियाणे आणि तेही शेतकरी स्वत: तयार करतात. त्यामुळे बियाणाचा खर्च नाही आणि रासायनिक खतांची फवारणी नाही. त्यामुळे अधिकचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरी पडते.
दरम्यान, वातावरणातील बदलाचा परिणाम यंदा मुख्य पिकावर झालेला आहे. मात्र, गाजर हे तीन महिन्याचे पीक असून यंदाही याला पोषक वातावरण आहे. पिकाला कमी पाणी आणि कुठलीही फवारणी अथवा रासायनिक खतांची गरज भासत नाही,शंभर टक्के सेंद्रिय असल्यामुळे त्याची गोडी चांगली असल्याने बाजारात या गाजराना मागणी वाढत आहे. शून्य खर्च असलेल्या या पिकातून 3 महिन्यात 1 लाखाचे उत्पन्न घेतले जाते. शिवाय याची काढणी होताच इतर पिकांसाठी या जमिनीचा वापर केला जातो. गाजराच्या पाल्याचा जनावरांसाठी चारा म्हणून वापर केला जात असल्यामुळे चाऱ्यावरचा खर्चही कमी झाला असल्याचे शेतकरी सांगत आहेत.