क्राइम
फेसबुकवर जाहिरात करून केजच्या व्यापाऱ्याला घातला पावणे सहा लाखांचा गंडा……!
केज दि.२९ – फेसबुकवर सफरचंदाची जाहिरात करून दिल्ली वरून माल पाठवण्याचा बहाणा करून केजच्या व्यापाऱ्याला पावणे सहा लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला असून केज पोलीसांत तक्रार देण्यात आली आहे.
दिल्ली येथील शादाब नावाच्या व्यक्तीने फेसबुकवर सफरचंदाची जाहिरात केली होती. सदर जाहिरात केज येथील शिमला फ्रुट कंपनीचे मालक गफार सत्तार बागवान यांनी पाहिली. गफार बागवान हे विविध ठिकाणावरून फळे विक्रीसाठी मागवत असल्याने व त्यांना जाहिरातीतील सफरचंद आवडल्याने त्यांनी त्या जाहिरातीवरून दिल्लीच्या शादाब याच्याशी संपर्क केला. त्यानुसार त्यांचा व्यवहार ठरला व गफार यांनी मागणी केल्यानुसार शादाब ने माल पाठवत असल्याचे सांगितले. त्यानुसार शादाब याने माल भरतानाचा ट्रक चा फोटो व्हाट्सएपच्या माध्यमातुन गफार यांना पाठवला व ट्रान्सपोर्ट तसेच ट्रक चालकाचे नाव सांगून गफार यांचा विश्वास संपादन केला.त्यानुसार गफार यांनी सदरील मालाचे व ट्रक भाड्याचे मिळून शादाब ने सांगितलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यावर तसेच फोनपे वर 5 लाख 75 हजार रुपये पाठवले.
दरम्यान पैसे पाठवल्यानंतर 30 डिसेंबर 2021 रोजी गाडी पाठवली असे सांगीतले परंतु सदर माल न मिळाल्याने गफार यांच्या लक्षात येता त्यांनी केज पोलीसांत धाव घेतली असून शादाब तसेच तसेच सागर ट्रान्सपोर्ट, चालक राजीव आणि एजाज यांच्या विरुद्ध तक्रार दिल्यावरून केज पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एएसपी पंकज कुमावत, एपीआय शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे करत आहेत.