क्राइम
पॉलिश करण्याच्या बहाण्याने १ लाख १५ हजार रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला…..!
केज दि.१८ – सोन्याच्या दागिन्याला पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने एका वृद्ध महिलेचे दागिने घेऊन चक्क त्या ऐवजी पुडीत खडे बांधून दिल्याची घटना शहरात घडली आहे.
दि. १७ फेब्रुवारी रोजी केज येथील समर्थनगर येथील जोशी यांच्या घराचे लोखंडी चॅनेल गेट उघडे असताना दोन अनोळखी इसमानी रजनीबाई अनंत जोशी या ७८ वर्ष वयाच्या महिलेस तुमचे सोन्याचे दागिने उजळून व पॉलिश करून देतो असे म्हणून त्यांच्याकडील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठन व अडीच तोळे वजनाचे गंठन त्यांच्या कडून घेतले. त्याची किंमत १ लाख १५ हजार रु आहे. त्यानी ते दागिने त्यांच्याकडे घेताच हातचलाखी करीत त्याची अदलाबदल केली आणि एका पुडी नंतर त्यांच्या हातात दिली. ते दोघे अनोळखी इसम बाहेर गेल्या नंतर रजनीबाई जोशी यांनी ती पुडी उघडून पहिली असता त्यात सोन्याचा दागिन्यांच्या वजनाचे खडे असल्याचे निदर्शनास आले. जोशी यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी केज पोलीस ठाण्यात दि. १७ फेब्रुवारी रोजी फिर्याद दिली आहे. त्या नुसार ठाणे अमंलदार यादव यांनी गुन्हा दाखल करून घेतला असून दोन अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४३/२०२२ भा.दं.वि. ३८० व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दिलीप गित्ते हे पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, नागरिकांची आशा प्रकारे सोन्या-चांदीचे दागिने यांना कोणी पॉलिश करून देण्याचा उजळून देण्याच्या किंवा स्वस्त किमतीत सोने किंवा इतर ऐवज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक होऊ शकते. म्हणून जर असे कोणी अशा प्रकारे आमिष दाखवीत असेल तर पोलिसांशी संपर्क साधून अशा संशयित व्यक्तींना पोलिसांच्या ताब्यात द्यावे असे आवाहन शंकर वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.