क्राइम
समाधीची तोडफोड करीत मारुती मूर्तीची केली विटंबना ; दोघे केज पोलिसांच्या ताब्यात…..!
केज दि.२७ – शहरापासून जवळच असलेल्या चिंचपूर मारुती मंदिरसमोरील समाधीची दगडाने तोडफोड करीत दोघांनी मूर्तीवर दगड मारल्याने मूर्तीचा टवका निघाला असून मूर्तीची विटंबना केल्याचा प्रकार २७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडला. पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज येथील माजी मंत्री अशोक पाटील यांच्या शेताजवळ चिंचपूर मारुतीचे मंदिर असून मंदिरात मारुतीची दक्षिण मुखी मूर्ती आहे. केज व परिसरातील भाविक मोठ्या श्रध्देने दर शनिवारी मंदिरात दर्शनासाठी जातात. मंदिराच्या सभामंडपासमोर पाटील यांचे आजोबा जयवंतराव पाटील यांची ४ बाय ४ फूटची मार्बल फरशी बसविलेली समाधी असून समाधीवर हनुमान यांच्या पादुका बसविल्या आहेत. तर माजी जि. प. सदस्य सुरेश पाटील हे मंदिराची देखभाल व पूजा करतात. २७ फेब्रुवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास मंदिरासमोर कोणीतरी बोलत असल्याचा आवाज ऐकून अशोक मुळे, अरुण मुळे, राम जंगम यांनी जाऊन पाहिले. त्यांना श्रीराम उर्फ बापु प्रकाश डबरे, अमोल रामचंद्र कुरूद ( दोघे रा. केज ) हे दोघे दिसून आल्याने त्यांना येथे थांबू नका, निघून जा. असे सांगितले. मात्र त्यांनी तुमच्या बापाचे मंदिर आहे का ? असा सवाल करीत जयवंतराव पाटील यांच्या समाधीची दगड मारून तोडफोड करू लागले. त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता तुम्ही मध्ये पडू नका म्हणत त्यांनी मार्बल फरशी फोडून समाधीची तोडफोड केली. त्यांना असे करू नका, देवाचे मंदिर आहे असे म्हणाल्यावर श्रीराम डबरे व अमोल कुरुंद हे देवाचे मंदिर आहे का असे म्हणत मूर्तीवर दगड फेकून मारला. त्यामुळे मारुतीच्या मूर्तीच्या उजव्या बाजूचा टवका निघाला. ते दोघे त्यांचे न ऐकता पुन्हा समाधीची तोडफोड करू लागल्याने अशोक मुळे यांनी फोन करून सुरेश पाटील यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी जाऊन हा प्रकार डोळ्याने बघितला. या प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावल्याची फिर्याद सुरेश पाटील यांनी दिल्यावरून श्रीराम डबरे व अमोल कुरुंद या दोघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल
झाला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. फौजदार राजेश पाटील हे पुढील तपास करत आहेत.