आपला जिल्हा
करोडों रुपयांचा विकास हरवला, ईडी चौकशीची मागणी..…..!

केज दि.२८ – मोठे मासे ईडीच्या गळाला लागतात परंतु बारके मासे पण करोडोंचा भ्रष्टाचार करून माला माल झाले आहेत.ग्रामीण भागात ईडीने लक्ष घालावं अशी मागणी आता ग्रामीण भागातून होत आहे. बीड च्या नांदूरघाट जिल्हा परिषद गटामध्ये पाच वर्षात १०० करोड रुपयांच्या वर रकमेची कामे झाली परंतु त्या मध्ये अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसे चे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस यांनी करत ईडीने नांदुरघाट गटामध्ये लक्ष घालावे अशा आशयाचे बॅनर केज तालुक्यातील गावा गावात लावले आहेत.
नांदूरमध्ये ६०० मीटर सिमेंट रस्त्याच्या बांधकामासाठी तब्बल ५ करोड रुपये खर्च करून काम चालू आहे ते पण प्रचंड प्रमाणात बोगस आहे. नांदूरघाट जिल्हा परिषद गटामध्ये झालेल्या कामाची व भाजपा पक्षाच्या नांदुरघाट गटाच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या मालमत्तेची ईडीने चौकशी करावी या मागणीच्या बॅनर वर भाजपा चे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या विषयामध्ये लक्ष घालावे व चौकशीची मागणी करावी असे आवाहन बॅनर द्वारे मनसे चे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस यांनी केले आहे.
निवडणुका जवळ आल्या की कामाला सुरुवात केली जाते. एरवी मात्र कामे न करता कामांची बिल उचण्याचा प्रकार नांदूरघाट चे जिल्हा परिषद सदस्य करत आहेत. अनेक अशी कामे आहेत की जी दोन तीन वर्षांपासून सुरू आहेत परंतु अद्याप पूर्ण झाली नाहीत. कामांचा कालावधी संपला तरी संगनमताने शासकीय अधिकाऱ्यांना हाताखाली धरून कामे रेंगाळत ठेवत आहेत. व कामे पूर्ण होण्याच्या आधी करोडो रुपयांची बिले उचलत आहेत.
