आपला जिल्हा
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र…..!
बीड दि.२८ – भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेसंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिलंय. बीड जिल्हयात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णतः ढासळली असून पोलिसांचा कसलाही धाक गुन्हेगारांवर राहिला नाही. चोऱ्या, खून, मारामाऱ्या, महिलांवर अत्याचार अशा घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. या घटनांमुळे सर्व सामान्य नागरिकांत भीती निर्माण झाली असून याची गंभीर दखल घेतली गेली पाहिजे, त्यासाठी फक्त बीडच्या विषयावर विशेष बैठक बोलवावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहराज्यमंत्री आणि विशेष पोलीस महानिरीक्षक यांना पत्र पाठवून केली आहे.
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटना अतिशय चिंताजनक बाब बनली आहे. गुन्हेगारीच्या वाढत्या घटना गंभीरतेने घेण्याची गरज निर्माण झाली आहे. केवळ बीडच्या कायदा-सुव्यवस्था विषयावर स्वतंत्र व विशेष बैठक घेऊन गुन्हेगारांच्या विरोधात कठोर पावले उचलावीत आणि परिस्थिती नियंत्रणात आणून सर्व सामान्य नागरिकांच्या मनातील भीती दूर करावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी पत्राद्वारे केली आहे.