लॉकडाऊनमुळे लोकांचे उत्पन्न कमी झाले आहे. मात्र प्रवासाची गरज वाढली आहे. अशा परिस्थितीमध्ये नवी कार घेण्याऐवजी ग्राहक जुन्या कार घेणे पसंत करू लागले असल्याचे दिसून येते. कारमध्ये अधिक सुरक्षित प्रवास होत असल्यामुळे आगामी काळात कारची मागणी वाढेल, असे अनेक कंपन्यांनी या अगोदरच सांगितले आहे.
या पार्श्वभूमीवर कार ट्वेंटी फोर या संस्थेने ग्राहकांचे सर्वेक्षण केले असता छोट्या जुन्या कार घेण्यास ग्राहक अधिक पसंती दर्शवू लागले आहेत. लॉकडाउनच्या काळात केलेल्या सर्वेक्षणामध्ये 40 ते 45 टक्के ग्राहकांनी सांगितले की, ते सार्वजनिक वाहतुकीपेक्षा स्वतःची कार घेण्यास प्राधान्यक्रम देणार आहेत.कारण त्यामध्ये अधिक सुरक्षितता असते. ज्या ग्राहकांनी लॉकडाऊनअगोदर कार घेण्याचे ठरविले होते त्यांच्या निर्णयावर लॉकडाऊनमुळे काय परिणाम झाला, याची पडताळणी केली असता 23 टक्के ग्राहकांनी सांगितले की, दरम्यानच्या काळात त्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला असल्यामुळे त्यांनी आता जुनी कार घेण्याचे ठरवले आहे.
लॉकडाऊन आगोदर आपल्या कार विकणाऱ्यांची संख्या आणि कार विकत घेणाऱ्यांची संख्या सर्वसाधारणपणे समान होती. मात्र लॉकडाऊननंतर विकणाऱ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. तर कार विकत घेऊ इच्छिणाऱ्यांची संख्या वाढू लागली असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सर्वसाधारण जुन्या कारच्या दरात घट होऊ लागली असल्याचे ते म्हणाले.