विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस……!
पुणे दि.१२ – राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात नोटीस बजावण्यात आली आहे.
फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालात रश्मी शुक्ला दोषी आढळल्या होत्या. त्यानंतर पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रश्मी शुक्लानंतर आता फडणवीसांना या प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.पुणे पोलिसांनी कलम 160 अंतर्गत देवेंद्र फडणवीसांना नोटीस बजावली असून त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र पोलीस फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन चौकशी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर रश्मी शुक्ला यांनी गुन्हा दाखल होताच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर 25 मार्चपर्यंत कठोर कारवाई न करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या.
दरम्यान, फडणवीस सरकारच्या काळात गृहमंत्रीपदही देवेंद्र फडणवीसांकडे होतं. देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरूनच रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडीत नेत्यांचे फोन टॅप केले असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला होता. त्यामुळे या चौकशीतून काय समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.