#Social
शिराळा येथे उपजिल्हा रुग्णालयात मुलांची मोफत टू डी इको तपासणी……..!
शिराळा दि.१२ (अमोल पाटील) – बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत
(आर बी एस के) संशयित हृदयरोग कारणासाठी संदर्भित करण्यात आलेल्या बालकांची मोफत टू डी इको तपासणी शिबिर शुक्रवार दिनांक 11/3/2022 रोजी डी ई आय सी इमारत सिविल हॉस्पिटल सांगली आवार या ठिकाणी हृदय रोग तज्ञ डॉ. अर्जुन आडनाईक यांचेमार्फत करण्यात आली. या शिबिरामध्ये शिराळा तालुक्यातील 26 बालकांची मोफत इको तपासणी करून पात्र बालकांना डिवाइस क्लोजर व ओपन हार्ट शस्त्रक्रियेसाठी संदर्भित करण्यात आले.
आर बी एस के अंतर्गत शिराळा तालुक्यामध्ये दोन पथके कार्यरत असून यामध्ये डॉ. संदीप साळी, डॉ. प्रकाश मोरे, डॉ. सुवर्णा पाटील, डॉ. प्रियांका चव्हाण, अमोल रसाळ, सुषमा पाटील व यशश्री जाधव हे कर्मचारी कार्यरत आहेत. शिराळा तालुक्यामध्ये आर बी एस के अंतर्गत सन 2021-22 सालामध्ये एकूण 262 अंगणवाडी व 230 शाळांमधील एकूण 30840 बालकांची आरोग्य तपासणी करून त्यापैकी 2016 मुलांवर शाळेतच उपचार करण्यात आले तसेच एकूण 2006 गंभीर आजार असलेल्या बालकांना पुढील उपचारासाठी विविध रुग्णालयात संदर्भित करण्यात आले. आर बी एस के अंतर्गत शिराळा तालुक्यामध्ये आजतागायत 82 हृदयशस्त्रक्रिया व 933 इतर शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी उपजिल्हा रुग्णालय शिराळा मधील सर्व अधिकारी व कर्मचारी, गटशिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तसेच शिराळा तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा यांचे उत्तम सहकार्य मिळाले.