पोलीस भरतीमध्ये ”या” उमेदवारांना मिळणार अतिरिक्त गुण…..!
बीड दि.२० – महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आगामी काळात 7231 पदांवर पोलीस शिपाई भरती करणार असल्याचं जाहीर केलं होतं. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत बोलताना एनसीसी प्रमाणपत्र असलेल्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये गुण देण्यात येणार असल्याचं म्हटलं होतं. आता महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी नागपूरमध्ये बोलताना एनसीसी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना पोलीस भरती प्रक्रियेत कशा प्रकारे गुण देण्यात येतील यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे.
एनसीसी (NCC) म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेना प्रमाणपत्र प्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये अतिरिक्त गुण देण्यासंदर्भातील शासन निर्णय आणि राजपत्र देखील प्रसिद्ध झालं आहे. राज्यात आगामी पोलीस भरतीमध्ये एनसीसीचं प्रमाणपत्र असलेल्या तरुणांना वाढीव गुण दिले जातील, अशी माहिती क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे. ज्या तरुणांकडे एनसीसी A सर्टिफिकेट असेल, त्याला एकूण गुणांच्या 2 टक्के अतिरिक्त गुण पोलीस भरतीसाठी मिळतील. B सर्टिफिकेट असलेल्या तरुणांना एकूण गुणांच्या 3 टक्के मार्क मिळतील.C सर्टिफिकेट असलेल्या तरुणांना एकूण गुणांच्या 5 टक्के मार्क मिळतील.या संदर्भातील जीआर काढण्यात आला असल्याची माहिती मंत्री सुनील केदार यांनी दिली.