येत्या तीन महिन्यांत टोल नाक्यांची संख्या कमी होणार…..!
नविदिल्ली दि.२३ – देशातील महामार्गावरील प्रवास आगामी काळात स्वस्त होणार आहे. सरकार ठराविक मर्यादेत एकदाच टोल घेणार आहे. यासोबतच टोल प्लाझाजवळ राहणाऱ्या आणि महामार्गावरून सतत प्रवास करणाऱ्या स्थानिकांनाही यामुळे दिलासा मिळणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत सरकारच्या या योजनेची माहिती दिली. त्यानुसार आता महामार्गावरील टोल प्लाझाची संख्या मर्यादित असेल, तर स्थानिकांना आता टोल भरावा लागणार नाही. सरकारची ही योजना येत्या ३ महिन्यात लागू होणार आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज घोषणा केली की सरकार येत्या ३ महिन्यांत देशातील टोलनाक्यांची संख्या कमी करणार असून ६० किमीच्या परिघात फक्त एकच टोलनाका कार्यरत असेल. आज लोकसभेत हे विधान करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, ६० किमीच्या परिसरात येणारे इतर टोलनाके येत्या ३ महिन्यांत बंद केले जातील. त्याचवेळी, केंद्रीय मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, टोल प्लाझाजवळ राहणाऱ्या लोकांना टोल भरावा लागणार नाही, त्यांना पास जारी केला जाईल. यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला दिलासा मिळणार आहे. तसेच अधिकाधिक लोक टोल भरून महामार्गावरून प्रवास करण्यास प्रवृत्त होतील.
दरम्यान, महामार्गावरील वाहतूक वाढवून टोलचे उत्पन्न वाढवण्यावर सरकारचा भर आहे. त्याचबरोबर टोलनाक्याजवळ राहणाऱ्या नागरिकांना टोलमध्ये सवलत द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते आहे. कारण स्थानिकांना हायवेवरून सतत प्रवास करावा लागतो. टोल प्लाझाजवळ राहणाऱ्यांनाही सरकारच्या या नव्या योजनेचा भरपूर फायदा मिळण्याची अपेक्षा आहे.