क्राइम
मटका घेणाऱ्या व खेळणाऱ्यावर गुन्हे दाखल…..!
केज दि.३१ – सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी आता केजमध्ये सुरू असलेल्या मटक्या विरुद्ध ठोस व सर्वात मोठी धडक कार्यवाही केली आहे. त्यांनी आता थेट मटका चालका विरुद्ध कारवाई करून मटका चालविणारा मालक व त्याच्यासह १२ जणांना ताब्यात घेत एकदाच एकूण ५० जणांच्या विरुद्ध कारवाई करून एकूण साडेतीन लाख रु. चा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
दि. ३० मार्च रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना केज शिवारामध्ये इंगळे वस्तीवर असलेल्या खोलीत गणेश सुधीर खराडे हा मटक्याचा अवैध धंदा करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी तात्काळ ही माहिती त्यांच्या पथकाला देऊन कारवाई करण्याचा आदेश दिला.
आदेश मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्यासह पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोलीस नाईक अनिल मंदे, महादेव बहिरवाल, गृहरक्षक दलाचे जवान बिक्कड व शिरसाट यांच्या पथकाने सायंकाळी ४:३० वा. धाड टाकली. या धाडीत त्यांनी थेट मटक्याचा मालक गणेश सुधीर खराडे याच्यासह 12 जणांकडून कडून रोख ३० हजार ४०० रु. आणि टॅब, मोबाईल, ७ मोटार सायकली, मटक्याच्या चिठ्या व साहित्य असा एकूण ३ लाख ४७ हजार ४७० रु. चा मुद्देमाल जप्त केला. तसेच त्यांची अधिक चौकशी केली असता केज आणि परिसरातील त्यांचे मटका बुक्की चालविणाऱ्या ५० एजंटांवर पोलीस नाईक अनिल मंदे यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.