क्राइम
50 वर्षीय पुजाऱ्याचा खून, परिसरात खळबळ….!

बीड दि.2 – अंबाजोगाई शहरालगत असलेल्या शेपवाडी येथे गुढीपाडव्याच्या दिवशी आज (दि.२) एका पुजाऱ्याचा माथेफिरूने खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुपारी १ च्या सुमारास ही घटना घडली आहे.
हनुमान मंदिराचे पुजारी संतोष दासोपंत पाठक (वय ५०, रा. रविवार पेठ, अंबाजोगाई) यांचा चाकूने भोसकून खून करण्यात आला.संतोष पाठक यांच्याकडे शेपवाडी गावातील सर्व पूजाअर्चा असतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज गुढीपाडवा असल्याने ते सकाळपासून शेपवाडी गावातील हनुमान मंदिरात थांबले होते. दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांच्यावर एका माथेफिरूने चाकूने अनेक वार केले.
दरम्यान, ग्रामस्थांनी गंभीर जखमी झालेल्या पाठक यांना तातडीने स्वाराती रुग्णालयात दाखल केले, परंतु तिथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.