#Accident
बेधुंद कारचालकाने तीन कुटुंबातील तरुणांचा घेतला बळी……!
अंबाजोगाई दि.५ – तालुक्यातील घाटनांदूर येथे सोमवारी रात्री भरधाव वेगातील कारच्या धडकेतील मृतांची संख्या तीन झाली आहे. गंभीर जखमी झालेल्या रमेश विठ्ठल फुलारी (वय ४७) यांचा लातूरच्या रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. दरम्यान, तीन बळी घेणाऱ्या हा अपघात एका सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याचे फुटेज अंगावर शहारे आणणारे आहे. कार अतिशय वेगात असल्याचे या फुटेजमध्ये स्पष्ट दिसून येत आहे.
सोमवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास एक कार (एमएच २० व्ही २५१८) भरधाव वेगाने अंबाजोगाईकडून आली. ही कार घाटनांदूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनियंत्रित झाली आणि रस्त्यावर उभे असलेल्या चौघांना धडक देऊन जवळपास शंभर मीटर अंतर फरफटत नेले. यात वैभव सतीश गिरी (वय २८), लहू बबन काटुळे (वय ३०) यांचा मृत्यू झाला. तर, रमेश विठ्ठल फुलारी (वय ४७), उद्धव निवृत्ती दोडतले (वय ५०) आणि कारमधील दोघे गंभीर जखमी झाले. रमेश फुलारी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील।उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले होते. मात्र त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. दरम्या , तीन बळी घेणारी ही कार एवढी वेगात होती की तिच्या धडकेने रस्त्यावरील विद्युत खांब देखील उन्मळून पडला. कारमधील तिघेही मद्यधुंद होते असा दावा केला जात आहे. हा अपघात एका सीसीटीव्हीत कैद झाला असून रात्री उशिरा त्याचे फुटेज समोर आले.