#निधन वार्ता
तरुणाचा मृतदेह आढळलला, केज तालुक्यातील घटना…..!

केज दि.५ – तीन दिवसांपासून गायब असलेल्या येथील एका तरुणाचे प्रेत आसरडोह रस्त्यावरील विहिरीत दि.५ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास आढळून आले. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही.
शेख निसार तुराब रा. आडस ता. केज असे मयत तरुणाचे नाव आहे. निसार हा शनिवार ( दि. २ ) पासून घरातून गायब होता. कुटुंबातील व्यक्तींनी त्याचा शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही. आज मंगळवारी ( दि. ५ ) दुपारी पाण्याचे खाजगी टँकर पाणी आणण्यासाठी रामदास विश्वनाथ ढोले यांच्या आसरडोह रस्त्यावरील शेतातील विहीरीवर गेले होते. त्यावेळी पाण्यावर तरंगत असलेला मृतदेह आढळून आला. याची खबर धारुर पोलीसांना देताच एपीआय विजय आटोळे, एएसआय गोविंद बास्टे यांच्या सह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पाण्यातून बाहेर काढलं असता तो शेख निसार तुराब याचा असल्याचे कुटुंबातील व्यक्तींनी ओळखले. दरम्यान, पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस तपासात तो निष्पन्न होईल.