शिक्षकांअभावी अभ्यासाचे नुकसान……!
शिक्षकांअभावी पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे प्रचंड नुकसान होत आहे. सर्वच शाळांमध्ये गणित, विज्ञानसह इतर विषयांच्या शिक्षकांचा तुटवडा आहे. मागील दोन वर्षांत शाळांमधून निवृत्त झालेल्या किंवा मृत पावलेल्या शिक्षकांच्या पदांवर नेमणुकाच झालेल्या नाहीत. त्यामुळे नववी, दहावीच्या वर्गांना गणित, विज्ञानसारखे विषय शिकविण्यास तज्ञ शिक्षकच नाहीत. अनुकंपा तसेच बालसंगोपन रजेवर गेलेल्या शिक्षकांच्या जागेवर बदली शिक्षकच देण्यात येत नसल्याने शाळांमधील परिस्थिती सध्या बिकट झाली आहे.
मे 2012 पासून राज्यात शिक्षक भरती बंद आहे. यानंतर शिक्षकांची काही पदे भरण्यात आली. मात्र गेल्या काही वर्षांत बंद पडलेल्या शाळांमुळे सुमारे 600 शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. सरकारी तिजोरीवर भार नको यासाठी या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्याशिवाय नवी शिक्षक भरती होणे शक्य नाही. मात्र याचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे, असे शिक्षक भारतीचे कार्यवाह सुभाष मोरे यांनी सांगितले. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांमध्ये गणित, विज्ञानाचे शिक्षक नाहीत. भाषा विषयांचे शिक्षक अतिरिक्त असून हे शिक्षक गणित, विज्ञानसारखे विषय शिकवू शकत नाहीत आणि जोवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होत नाही तोपर्यंत विषय शिक्षकांची नेमणूकही होणार नाही. यात नुकसान केवळ विद्यार्थ्यांचेच आहे, असेही मोरे म्हणाले.
राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांची दखल घेत माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी गणित आणि विज्ञान विषयांच्या रिक्त पदांची माहिती शाळांकडून मागविली आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे शाळांना शिक्षणामध्ये अडचणी येत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने 27 एप्रिलपर्यंत शाळांनी सदर माहिती माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडे सादर करायची होती. ही माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे पालकर यांनी सांगितले.