ऊस पेटवून देत शेतकऱ्याची आत्महत्या…..!
गेवराई- जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला असून ऊस शेतातच उभा असल्यामुळे आज (दि.११) दुपारी १ च्या सुमारास शेतकऱ्याने ऊस पेटवून देत शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
नामदेव आसाराम जाधव (वय-35 रा.हिंगणगाव ता.गेवराई) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.बीड जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील ऊस अद्यापही शेतकऱ्यांच्या शेतात ऊभा आहे. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट असून आपल्या शेतातील ऊस कारखाना नेईल की नाही ? हि शाश्वती नसल्याने शेतकरी नैराश्येत आहे. यामधूनच गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील नामदेव जाधव यांनी कारखान्याकडे वेळोवेळी ऊस घेऊन जाण्याबद्दल विनंती केली. मात्र अद्यापही ऊस तोडून न नेल्याने त्यांनी आज बुधवारी दुपारी शेतातील उभ्या ऊसाला नैराश्यातून आग लावली. यानंतर शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून अतिरिक्त ऊसाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.