#Accident
ऊसतोड कामगार महिलांवर काळाचा घाला……!
अहमदपूर दि.१४ – तालुक्यातील किनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तुळशीराम तांडा इथे कपडे धुण्यासाठी गेलेल्या ५ महिलांचा तलावात बुडून मृत्यू झाला. मृत पाचही महिला ह्या परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील रहिवासी आहेत. पाण्याचा अंदाज न आल्याने एक तरुणी पाय घसरून पाण्यात पडली आणि तिला वाचवण्यासाठी एकामागून एक धावलेल्या अशा एकूण पाच जणी बुडाल्या. या महिलांसोबत असलेल्या १० वर्षीय मुलाने आरडाओरड केल्याने हा प्रकार लक्षात आला.
लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील उजना गावाजवळील तुळशीराम तांडा इथे ऊस तोडणीच्या कामासाठी परभणी जिल्ह्याची टोळी गेल्या पाच महिन्यापासून मुक्कामी आहे. यात पालम तालुक्यातील मूळच्या मोजमाबाद तांडा आणि रामपूर तांडा येथील बंजारा समाजाच्या महिलाही आहेत. यातील पाच जणी कपडे धुण्यासाठी उजना गावाजवळील पाझर तलावात सकाळच्या सुमारास गेल्या. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील एक तरुणी पाय घसरून पाण्यात पडली. त्या तरुणीला वाचविण्यासाठी तिची आई आणि सोबत आलेल्या इतर महिलांनीही एकमेकींना वाचविण्याचा प्रयत्न केला. यापैकी कुणालाही पोहता येत नसल्याने एकामागून एक अशा पाचही जणी पाण्याचा अंदाज न आल्याने तलावात बुडाल्या.
मृत महिलांमध्ये राधाबाई धोंडीबा आडे (वय ४५ वर्षे ), काजल धोंडीराम आडे (वय १९ वर्षे), दीक्षा धोंडिबा आडे (वय – २२ वर्षे ) सर्व रा. रामपूर तांडा या एकाच घरातील आई आणि दोन मुली आहेत. तर सुषमा संजय राठोड (वय २१ वर्षे ) आणि अरुणा गंगाधर राठोड राहणार (वय २५ वर्षे ) दोघीही रा. मोजमाबाद तांडा यांचा समावेश आहे. यावेळी सोबत असलेल्या १० वर्षीय मुलाने आरडाओरड केल्याने हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर ग्रामस्थांनी या पाचही मृतदेह बाहेर काढले. ऊस तोडणीच्या कामासाठी परभणी जिल्ह्यातील ऊसतोड टोळी पाच महिन्यांपासून अहमदपूर तालुक्यातील ऊस तोडणीच्या कामासाठी आलेल्या आहेत. येत्या काही दिवसांत साखर कारखाना बंद होणार असल्याने ऊसतोड महिला शनिवारी सकाळी तुळशीराम तांडा येथील तलावावर कपडे धुण्यासाठी होत्या.
याप्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास किनगाव पोलीस करीत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी बोलताना दिली.