क्राइम
एक लाख रुपयांची मागणी करत दोन महिलांचा छळ……!
केज दि.१६ – एका महिलेचा कर्ज फेडण्यासाठी माहेरहुन एक लाख रुपये घेऊन ये म्हणून तर दुसऱ्या महिलेचा दुचाकी घेण्यासाठी एक लाख रुपये घेऊन येण्याच्या कारणावरून शारीरिक व मानसिक छळ केल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. याप्रकरणी दोन्हीच्या पतीसह सहा जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पहिल्या घटनेत विडा ( ता. केज ) माहेर असलेल्या प्रियांका बाबासाहेब कांबळे ( वय २६ ) या महिलेचा सहा वर्षांपूर्वी मंगरूळ ( ता. कळंब जि. उस्मानाबाद ) येथील बाबासाहेब मारुती कांबळे याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवस चांगले नांदविल्यावर प्रियांका हिस कर्ज फेडण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये घेऊन येण्यासाठी पती बाबासाहेब कांबळे, सासू द्वारकाबाई कांबळे या दोघांनी तगादा लावला. मात्र आईवडिलांची आर्थिक परिस्थिती नसल्याने तिने पैसे आणण्यास नकार दिल्याने या दोघांनी तिला सतत शिवीगाळ व मारहाण करून उपाशीपोटी ठेवत शारीरिक व मानसिक छळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. प्रियांका कांबळे हिने माहेरी येऊन केज पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पती बाबासाहेब कांबळे, सासू द्वारकाबाई कांबळे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक निर्मला गंभीरे पुढील तपास करताहेत.
दुसऱ्या घटनेत जिवाचीवाडी ( ता. केज ) माहेर असलेल्या संगिता विजय तांदळे ( वय २६ ) या महिलेचा सहा वर्षांपूर्वी वंजारवाडी ( ता. जामखेड जि. अहमदनगर ) येथील विजय बापु तांदळे याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही वर्ष चांगले नांदविले. त्यानंतर तुला मुलबाळ होत नाही, तुला नांदायचे असेल तर दुचाकी घेण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये घेवून ये असा तगादा पती विजय तांदळे, सासु सोजर तांदळे, दिर रवींद्र तांदळे, ननंद चंद्रकला सानप ( रा. सावरगाव घाट ता. पाटोदा ) यांनी लावला. तिने तेवढी रक्कम माहेरहून न आणल्याने तिला सतत शिवीगाळ व मारहाण करीत उपाशीपोटी ठेवत शारीरिक व मानसिक छळ केला. शेवटी ती माहेरहून पैसे घेऊन येत नसल्याने सासरच्या लोकांनी तिला घराबाहेर हाकलून दिले. अशी फिर्याद संगीता तांदळे हिने दिल्यावरून पती विजय तांदळे, सासु सोजर तांदळे, दिर रवींद्र तांदळे, ननंद चंद्रकला सानप या चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रुक्मिण पाचपिंडे या करीत आहेत.