हवामान
सकाळपासूनच पावसाच्या सरी बरसल्याने बळीराजाची धावपळ…..!
आज वळवाच्या पहिल्याच पावसाने नांदेडमध्ये सर्वदूर हजेरी लावली. जिल्ह्याच्या अनेक भागात सकाळपासून पावसाच्या सरी बरसत आहेत. कमाल तापमान 44 अंशापर्यंत गेल्याने जीवाची लाही लाही झालेल्या नांदेडकरांची या पावसामुळे उकाड्यापासून सुटका झालीय. हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज तंतोतंत खरा ठरवत वरूणराजाचे आगमन झाले.
या पावसामुळे नांदेडचे उष्ण वातावरण आता झटक्यात बदलले असून काहीसा गारवा निर्माण झालाय. आज भल्या पहाटेपासून नांदेड जिल्ह्यात वातावरणात बदल झाला होता, अनेक भागात आज काळ्याकुट्ट ढगांमुळे सूर्यदर्शन देखील झाले नाही. सकाळपासूनच सुरु झालेल्या पावसामुळे बळीराजाने पहाटेच धाव घेत शेत मालाची झाकाझाक केली. मात्र ज्यांना पावसाचा अंदाज आला नाही अश्या शेतकऱ्यांच्या हळद, उन्हाळी सोयाबीन भिजून काही प्रमाणात नुकसान देखील झाले. तर जिल्ह्यात आज काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाल्याने अनेकांचा शेतातील उभा असलेला ऊस आडवा झाला. यंदा कधी नाही ते अतिवृष्टीमुळे उसाच्या उत्पादनात वाढ झाल्याने ऊस गाळपा अभावी शेतात उभाच आहे. आता पावसाळा आला तरी ऊस कारखान्याने नेला नसल्याने आता करावं तरी काय असा प्रश्न बळीराजाला पडलाय.
आजच्या पूर्वमौसमी पावसाने बळीराजाची लगबग वाढणार आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी आपली जमीन नांगरून ठेवलीय, आजच्या पावसा नंतर काडीकचरा गोळा करून शिवार पेरणीसाठी सज्ज करण्यात येणार आहे. तसेच खते आणि बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची बाजारात गर्दी होण्यास सुरुवात होणार आहे.
उष्णतेच्या लाटेपासून रात्रीतून सुटका
नांदेडमध्ये यंदा कधी नव्हे ते तापमान 44 अंशाच्या आसपास पोहोचलं होत, साधारणतः एप्रिल च्या 20 तारखेपासून 18 एप्रिल पर्यंत कमाल तापमान वाढतेच राहिल्याने उष्णतेची तीव्र लाट जाणवत होती. सलग 30 दिवस उष्णतेची लाट कायम राहिल्याने नांदेडकरांच्या दैनंदिन जीवनावर विपरित परिणाम झाला होता. मात्र कालपासून वातावरणात बदल झाला असून कमाल पारा 39 अंशावर घसरला. त्यामुळे निसर्गाच्या चमत्काराने एकाच दिवसात उष्णतेची लाट गायब झालीय.
तर नांदेडमध्ये यंदा उष्णतेची लाट महिनाभर कायम राहिल्याने पाण्याच्या मागणीत मोठी वाढ झाली होती. जिल्ह्यात काल पर्यंत 22 टँकर द्वारे पाणीपुरवठा केला जातोय. त्याचबरोबर लोडशेडिंगमुळे पाणी असूनही जिल्ह्यातील सगळ्याच शहरातील पाणीपुरवठा योजनांवर परिणाम झाला होता. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती पहायला मिळालीय. मात्र आता उष्णतेची लाट कमी झाल्या नंतर पावसाचे आगमन सुखावणारे ठरणार आहे. त्यातून आता पाणीटंचाई पासून सुटका होण्याची आशा आहे.