बायकोच्या विरोधात नवरोबा बसले तहसील समोर उपोषणाला….!
नवरा बायकोतील भांडणात मारहाण होण्याचं आयुष्यावर उठण्याचे देखील प्रकार घडत असल्याचं आपण पाहतो. मात्र नवरा बायकोतील भांडण झाल्यावर कुणी उपोषणाला बसलं असेल असं तुम्ही कधी ऐकलं नसेल. बुलढाण्यातील नांदुरा येथील एक नवरोबा चक्क आपल्या बायकोच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर न्याय मागण्यासाठी उपोषणाला बसला आहे. गणेश मुरलीधर वदोडे असं या नवरोबाचे नाव आहे.
गणेश वदोडे यांच पाच वर्षांपूवी लग्न झालं होतं. काही कारणांनी त्यांचं आपल्या बायकोशी पटलं नाही म्हणून बायको त्यांना सोडून माहेरी गेली. अनेक दिवस वाट बघून बायको येत नसल्याने त्याने अनेकदा बायकोची मनधरणी केली पण काही फायदा झाला नाही. उलट बायकोने घटस्फोट न देता दुसरं लग्न केलं. नवरोबाची सटकली आणि थेट नांदुरा पोलीसात तक्रार दिली. तक्रार दिल्यावरही पोलिसांनी काहीही कारवाई केली नसल्याने आता चक्क नवरोबा तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.
दरम्यान, बायकोवर कायदेशीर कारवाई व्हावी या मागणीसाठी नवरोबा कालपासून नांदुरा तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसल्याने परिसरात चर्चेचा विषय बनले आहे.