एएसपी पंकज कुमावत यांच्या पथकाची आणखी एक कारवाई,साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त…..!
केज दि.३ – साळेगाव ( ता. केज ) येथील आठवडी बाजारातून खरेदी केलेल्या चार गायीसह सहा गुरे वाहनातून कत्तल करण्यासाठी घेऊन जात असताना एएसपी पंकज कुमावत यांच्या पथकाने पकडून त्यांची सुटका केली. पथकाने वाहनासह ६ लाख ५७ हजाराचा मुद्देमाल जप्त करून एकास ताब्यात घेतले. याप्रकरणी तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील साळेगाव येथे दर गुरुवारी गुरांचा आठवडी बाजार भरतो. या बाजारातून खरेदी करण्यात आलेल्या ४ गायी, १ कालवड, १ गोरे अशी जनावरे एका वाहनात भरून सायगाव ( ता. अंबाजोगाई ) येथे कत्तल करण्यासाठी जात असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत मिळाली. त्यावरून त्यांच्या पथकाने गुरुवारी केज शहरातील शिवाजी चौकात सापळा लावून ही जनावरे घेऊन चाललेले वाहन ( एम. एच. २३ एयू ३३३२ ) पकडले. पथकाने वाहन चालक तौफीक अल्ताफोद्दीन शेख ( रा. नेकनुर ता. जि. बीड ) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता मोसीम शेख ( रा. सायगाव ) व सलीम ( रा. घाटनांदुर ता. अंबाजोगाई ) यांच्या सांगण्यावरून घेऊन जात असल्याची माहिती दिली. त्यानंतर पथकाने ४ गायी, १ कालवड, १ गोरे व सदरील वाहन असा ६ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील जमादार बाबासाहेब रंगनाथ बांगर यांच्या फिर्यादीवरून वाहन चालक तौफीक शेख, मोसीम शेख, सलीम या तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तौफीक शेख याला अटक असून उर्वरित दोन आरोपी फरार आहेत. पुढील तपास पोलीस नाईक घोलप हे करीत आहेत.