#Accident
कुंबेफळ – सारणी रस्त्यावर पोकलेन पलटी…..!
केज दि.५ – विहिरीचे खोदकाम करून येत असलेले पोकलेन रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या खड्ड्यात पलटी झाल्याने पोकलेनचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तर पोकलेन पलटी होण्याअगोदर चालकाने बाजूला उडी मारल्याने सुदैवाने चालक बचावल्याची घटना केज तालुक्यातील कुंबेफळ – सारणी रस्त्यावर घडली.
केज शहरातील जुनेद मोहसीन इनामदार यांच्या मालकीच्या पोकलेनवर ( एम. एच. १२ क्यू. डब्ल्यू. ७०५६ ) ऑपरेटर व चालक म्हणुन लक्ष्मण महादेव डोंगरे ( रा. कोथळा ता. कळंब जि. उस्मानाबाद ) हे आहेत. ३१ मे रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास चालक लक्ष्मण डोंगरे हे कुंबेफळ येथील शेतकरी गोविंद ढोरे यांच्या विहीरीचे खोदकाम करुन त्या विहीरीवरुन दुसऱ्या विहीरीचे काम करण्यासाठी पोकलेन घेऊन कुंबेफळ ते सारणी ( आ. ) रस्त्याच्या साईड पट्टीने जात होते. याचवेळी साईड पट्टीवरून पोकलेन घसरुन रस्त्याच्या बाजुच्या मोठ्या खड्ड्यात पलटी होऊन पडली आहे. या अपघातात पोकलेनचे अनेक पार्टचे नुकसान होऊन त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तर पोकलेन मशीन खड्ड्यात घसरत असताना मशीनमधुन चालक लक्ष्मण डोंगरे यांनी बाहेर उडी मारल्याने बचावले असून त्यांना इजा झाली नाही. अशी फिर्याद पोकलेन मालक जुनेद इनामदार यांनी दिल्यावरून या घटनेची युसूफवडगाव पोलिसात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक संपत शेंडगे हे करीत आहेत.