क्राइम
केज तालुक्यात लाखो रुपयांचा वाळूसाठा जप्त……!
केज दि.१३ – तालुक्यातील नांदूरघाट परिसरात अवैद्यरित्या साठा करून ठेवलेल्या वाळू साठ्यावर सहाय्याक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने कारवाई करुन लाखो रुपयांची वाळू ताब्यात घेतली आहे.
सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदारा मार्फत अशी माहिती मिळाली की, केज तालुक्यातील नांदुरघाट व परिसरात काही लोकांनी विनापरवाना बेकायदेशीररित्या नदीतून उपसा करून वाळूचा साठा करून ठेवला आहे. माहिती मिळताच दि. १३ जून सोमवार रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल बालाजी दराडे, राजू वंजारे आणि तहसील कार्यालयातील महसूल विभागाचे मंडळाधिकारी एस. एन. पठाण, यु. एस. नागरगोजे, एफ. एस. हांगे, तलाठी संजय शिंदे यांनी सहा ठिकाणी छापे मारले. या कारवाईत पथकाने लाखो रु. किंमतीची सुमारे ९३ ब्रास वाळू जप्त केली. सदर वाळू कायदेशीर कारवाई करून नांदूरघाट येथील सरपंच पांडुरंग चांगण यांच्या ताब्यात दिली.
दरम्यान, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि तहसीलदार दुलाजी मेंडके यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी पठाण हे पुढील कारवाई करत आहेत. पंकज कुमावत यांच्या पथकाच्या कारवाईमुळे आता नदी परिसरात अवैद्यरित्या वाळूसाठा करून ठेवणाऱ्या वाळू चोर चांगलेच धास्तावले आहेत.