केज तालुक्यातील सावळेश्वर ( पैठण ) येथील मयत सतीश गोवर्धन मस्के ( वय २५ ) हा तरुण विनोद परमेश्वर तांबारे ( रा. आंदोरा ता. कळंब ) यांच्याकडे मॅनेजर म्हणून नोकरीस होता. सतीश मस्के याच्याकडे आठवडा भराचे ट्रॅक्टरला दगड गोळा करण्याच्या यंत्राचे कामाचे १ लाख रुपये जमा होते. १४ जून रोजी गावाकडे जात असताना पाऊस सुरू असल्याने सतीश याने पावसाने भिजू नये म्हणून दोन मोबाईल, एक लाख रुपयांची रक्कम, हिशोबाची डायरी, पाकीट हे एका कॅरीबॅगमध्ये ठेवले होते. पुढे गेल्यावर त्यांच्या दुचाकी व बसचा अपघात झाला. यावेळी सतीश मस्के व त्याचा साथीदार दीपक श्रीहरी डिसले ( वय २५ ) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी केजच्या रुग्णलयात आणले.
दरम्यान, सतीश मस्के याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अपघातस्थळी त्याच्या जवळील मोबाईल, पैसे ठेवलेली कॅरीबॅग पडली. ही पिशवी उचलून सुधाकर कविदास काळे ( रा. केज ) याने दोन मोबाईल व एक लाख रुपयांची रक्कम लांबविली. अशी फिर्याद विनोद तांबारे यांनी दिल्यावरून सुधाकर काळे याच्याविरुद्ध केज पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.