हवामान
आजपासून पावसाचा जोर वाढण्याचे संकेत……!
मुंबई दि.19 – जून महिन्याचे 15 दिवस उलटले तरी मराठवाड्यातील कांही जिल्ह्यांत अद्याप पाऊस हवा तसा पडत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मुंबई आणि नवी मुंबईमध्ये पावसाच्या सरी आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज दर्शवला आहे.
विदर्भात पावसाचे आगमन झाले आहे. अमरावती,वाशिम,गोंदियात देखील पावसाचे आगमन झाले आहे. अमरावतीत तुफान पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाचा अंदाज आहे. तर दक्षिण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात आजपासुन पावसाचा जोर वाढणार आहे. पालघरमध्ये हलक्या सरी बरसल्या आहेत. पावसामुळे पेरणी खोंळबल्याने त्या भागातील शेतकरी चिंतेत आहेत. गोंदियामध्येही पावसाने हजेरी लावली.
दरम्यान, महाराष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जाहिर करण्यात आले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर हवा तसा पाऊस अजुनही पडला नसल्याने नागरिकांना पावसाची प्रतिक्षा आहे. परंतु मराठवाडा अद्यापही कोरडाच असून कांही ठिकाणी तुरळक पाऊस वगळता अनेक ठिकाणी पावसाची प्रतिक्षा आहे. पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकून बीड जिल्ह्यातील शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाले आहेत. परंतु हवा तेवढा ओलावा नसल्याने पेरणी ची घाई न करण्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे.