शिंदे गटातील २१ आमदारांशी संपर्क, खा. संजय राऊत यांचा दावा…..!

मुंबई दि.२३ – एकवेळ महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडू, पण त्या आधी मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करा असं आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना केलं.वर्षावर आज शिवसेना आमदार ,कार्यकर्त्यांनी एकत्र जमत मीडियाशी संवाद साधला. यावेळी राऊत बोलत होते.
गुवाहाटी मधून पत्रव्यवहार करण्यापेक्षा किंवा मोबाईल वर बोलण्यापेक्षा मुंबईत या आणि बोला, हवं तर महाविकास आघाडीतून बाहेर पडू पण तुम्ही त्याआधी पुढच्या २४ तासात मुंबईत परत या आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा करा असं आवाहन संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना केलं आहे. दरम्यान, भाजपने शिवसेना आमदारांचे अपहरण केलं आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यासाठीच मी आज नितीन देशमुख आणि कैलास पाटील याना माध्यमांसमोर आणलं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या गटातील २१ आमदारांचा आमच्याशी संपर्क झाला असून हे सर्व आमदार मुंबईत आल्यावर आमच्या सोबत असतील असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे.राऊतांच्या या दाव्यामुळे नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.