राजकीय
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली पत्रकार परिषद……!

मुंबई दि.१ – मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवेसना पक्षप्रमुख या नात्यानं पहिल्यांच शिवसेना भवनातून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्याच्या जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी राजकीय घडामोडींवर पहिल्यांदाच सरकार पडल्यानंतर आणि नवं सरकार स्थापन झाल्याबाबतची प्रतिक्रिया दिली. शिवसेना भवनात मोठ्या संख्येने शिवसैनिक यावेळी जमलेले होते. उद्धव ठाकरे यांच्या संबोधनाआधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ही घोषणाबाजी थांबल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या संबोधनाला सुरुवात केली. तीन महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी यावेळी भाष्य केलं.
मेट्रो कारशेडचा मुद्दा पुन्हा एकदा आता राजकारण चर्चेत येणार आहे. माझा राग मुंबईवर काढू नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मेट्रो कारशेडवर महत्त्वाचं विधान उद्धव ठाकरे यांनी केलंय. माझा चेहरा आज पहिल्यांदा तुम्हाला पडलेला दिसत असेल. मला दुःख झालंय. माझ्या पाठीत खंजीर खुपसलाय. कांजूरचा प्रस्ताव आहे, त्यात आमचा काहीही अहंकार नाहीय. माझा राग मुंबईवर काढू नका. आरेचा आग्रह उगाच रेटू नका. पर्यावरणाची हानी करणारा निर्णय घेऊ नका. आता तर वरतीही तुमचं सरकार आहे, त्यामुळे मुंबईची जमीन मुंबईच्या हिसासाठी वापरा. कांजूरला गेल्यानंतर ती मेट्रो थेट बदलापूरपर्यंत जाईल, असा विचार करुन तो निर्णय घेतला आहे.
शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. अमित शाहांनी माझा शब्द पाळला असता, तर हेच सरकार शानदारपणे आलं असतं. माझं ऐकलं असतं, तर अडीचवर्ष तरी भाजपचा मुख्यमंत्री झाला असता, आता तर पाचही वर्ष होणार नाहीये, असं ते म्हणाले.
अमित शाह यांनी मातोश्रीवर माझ्यासोबत जो करार केला होता, त्यानुसार जर झालं असतं तर महाविकास आघाडी सरकारच जन्माला आलं नसतं. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, तर मुख्यमंत्र्यांची सही, मग माझी पक्षप्रमुख म्हणून सही, मग आमच्या कराराप्रमाणे हे पत्र फ्रेम करु मंत्रालयात लावायचं, म्हणजे सगळ्यांना कळलं असतं, ही नेमकं ठरलं काय असतं. हे असं सरकार करुन तुम्हाला काय मिळणार आहात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.