एकतर लवकर येत नाही अन आला तर असा येतो…..!
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस (Rain) सुरू आहे. काल रात्री हिंगोली जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. अतिमुसळधार पावसामुळे घरात पुराचं पाणी घुसल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. कुरुंदा गावाला पुराचा वेढा असून वीज, मोबाईल नेटवर्क गायब झाले आहे. त्यामुळे अनेकांचा संपर्क तुटला आहे. तसेच वसमत तालुक्यातील नदी काठच्या घरांची पडझड झाली आहे. तर शेतात पाणी साचले असून, गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील कुरुंदा परिसरात ढगफुटी दृश्य पाऊस झाल्याने या परिसराला पाण्याने वेढा दिला आहे. या पावसाचे पाणी कुरुंदा गावात अनेकांच्या घरात घुसले आहे. गावातील अनेकांचे संसार देखील पाण्यात बुडाले आहेत तर, या गावातील रस्ते देखील पाण्याच्या खाली गेले आहेत. कुरुंदा गावासोबत या परिसरातील इतर गावात देखील पावसामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने नागरिकांना मदत पोहोचवण्यासाठी पथके नियुक्त केली असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, ‘रात्री बारानंतर मोठा पाऊस झाला. आता शासनाच्या टीम मदत करत आहेत. सध्या पणी कमी होत आहे, गावातील उंच ठिकाणी नागरिकांनी हलवले आहे. नागरिकांनी घाबरुन जावू नये, सुरक्षीतस्थळी रहावे. हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे, अशी माहिती तहसिलदार अरविंद बोळंगे यांनी दिली.