नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. अनलॉक 2 अंतर्गत मोदी सरकारने अनेक निर्बंध शिथिल केले असून अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. 30 जून रोजी लॉकडाऊन संपत आहे. अनलॉकचा पहिला टप्पा सध्या सुरु आहे. दरम्यान मोदी सरकारने लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली आहे. अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. अनलॉक 2 मध्ये असणारी नियमावली केंद्र सरकारने जाहीर केली आहे.
अनलॉक 2 ची नियमावली
1. या अगोदरचं घरगुती विमान उड्डाणांना मर्यादित स्वरुपात परवानगी देण्यात आली आहे. याची संख्या आता वाढवण्यात येणार आहे.
2. नाईट कर्फ्यूमध्ये आता शिथिलता देण्यात येणार आहे. आता रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू राहिल. रात्री केवळ इंडस्ट्रियल यूनिट्स आणि अत्यावश्यक सामानाची वाहतूक करणारी वाहने, ट्रेन आणि विमानांना प्रवासाची मूभा असेल.
3. दुकानांमध्ये जागेनुसार एकाचवेळी 5 लोकांना प्रवेश देऊ शकतात. मात्र, यावेळी सोशल डिस्टन्सचं पालन करावं लागणार आहे.
4. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रशिक्षण संस्था 15 जुलैपासून उघडण्यात येतील. यासाठी वेगळ्या स्वरुपात गाईडलाईन्स देण्यात येणार आहे.
5. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसोबत चर्चेनंतर शाळा, महाविद्यालय आणि कोचिंग संस्था 31 जुलैपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
6. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक ‘वंदे भारत मिशन’ च्या अंतर्गत मर्यादित स्वरुपात होती. आता ती नियोजन पद्धतीने वाढवण्यात येणार आहे.
कंटेनमेंट झोनबाहेर खालील गोष्टींना बंदी
– मेट्रो, रेल्वे
– चित्रपट गृह, जिम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरियम, असेंबली हॉल आणि अशा प्रकारच्या अन्य सेवा बंद राहणार आहेत.
– सामाजिक, राजकीय, खेळ, मनोरंजन, अॅकडमिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आणि इतर मोठ्या गोष्टींना बंदी असणार आहे. या सर्व गोष्टींना सुरु करण्यासाठी परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार आहे.
– 31 जुलैपर्यंत कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन लागू असणार आहे. ज्या ठिकाणी कंटेनमेंट झोन नाही, अशा ठिकाणी काही प्रमाणात सूट देण्यात येणार आहे.
– राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेश परिस्थिती पाहून कंटेनमेंट झोनच्या बाहेर काही गोष्टींवर निर्बंध आणू शकते.
– राज्याच्या आतमध्ये किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात लोकांना येण्याजाण्यासाठी आणि वस्तूंची ने-आण करण्यासाठी सूट देण्यात आली आहे. यासाठी ई-पासची गरज लागणार नसल्याचे सांगण्यात आले नाही.
– आरोग्य सेतू अॅप वापरण्यासाठी प्रोत्साहन देणे चालूच राहणार आहे.